Breaking News

आम्रवृक्षाप्रमाणे कारखान्याचा आणि जनसामान्यांचा विकास साधणार - पंकजा मुंडे

परळी-वैजनाथ, दि. 03, सप्टेंबर - आम्रवृक्षाप्रमाणे कारखान्याचा आणि जनसामान्यांचा विकास साधण्यासाठी मी कटीबद्ध आहे. यावर्षी वैद्यनाथ साखर कारखाना  पूर्ण क्षमतेने चालवला जाऊन कारखान्याला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, यासाठी ऊस उत्पादक  शेतक-यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी आज केले. 
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोपीनाथ गडाच्या परिसरात आज मोठ्या प्रमाणावर आम्रवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी पंकजा मुंडे यांच्या शुभ हस्ते एका  आम्रवृक्षाची लागवड करण्यात आली. त्यानंतर एकाच वेळी सुमारे 400 आम्रवृक्षांची सर्व लोकप्रतिनिधी, मान्यवर व गावोगावच्या नागरीकांच्या हस्ते वृक्ष लागवड  करण्यात आली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, साहेबांना आंबा फार आवडत होता म्हणून त्यांच्या स्मारकाच्या परिसरात आंब्याची झाडे लावण्याचा निर्णय मी  घेतला आणि साहेबांचे ज्या कार्यकर्ता व नागरिकांवर जीवापाड प्रेम होते त्यांच्याच हस्ते ही वृक्ष लागवड केली. आंब्याचे झाड नेहमी गोड आणि रसाळ फळे देते अगदी  त्याचप्रमाणे मीही शेतकरी, शेतमजूर आणि नागरीकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. वैद्यनाथ कारखाना हा साहेबांचा आत्मा आहे. यावर्षी वैद्यनाथ पूर्ण क्षमतेने  चालवून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.