Breaking News

महिन्यात कारवाई करा आ. बच्चू कडू यांनी दिला इशारा

नाशिक, दि. 28, सप्टेंबर - केवळ बदलीचा फायदा लाटण्यासाठीच अर्पणपत्र सादर करून फायदा घेणा-यांची तपासणी करून एक महिन्यात कारवाई करावी.  अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्हा परिषदेत येऊन ठाण मांडू, असा इशारा प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकार्‍यांना काल दिला.
आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांच्या दालनात काल येऊन अपंगांच्या अखर्चित निधीसह, बोगस अपंग  प्रमाणपत्र, अपंग नोंदणी, अपंग कर्मचार्‍यांवरील अन्याय आदी मर सविस्तर चर्चा केली. पाच वर्षांपासून अखर्चित असलेल्या अंपगांच्या निधीबाबत मुख्य कार्यकारी  अधिकारी मीना यांनी केलेले नियोजन दाखवून मार्च अखेरपर्यंत सर्व निधी खर्च करण्याचे आश्‍वासन दिले. बदलीचा फायदा लाटण्यासाठी शिक्षण विभागातील अनेक  कर्मचार्‍यांनी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र दाखल केले आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गट शिक्षणाधिकार्‍यांना पाठवून केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती  दिली.
या वर कडू यांनी सांगितले की, या प्रमाणपत्रांची वैद्यकीय महामंडळाकडून पडताळणी करून घ्यावी. बोगस प्रमाणपत्र असल्यास संबंधित शिक्षकांप्रमाणेच ते प्रमाणपत्र  देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांविरोधात फौजदारी कारवाई करा. या प्रक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना महिनाभराची मुदत दिली असून त्यानंतर पूर्व सूचनेशिवाय  जिल्हा परिषदेत येऊन ठाण मांडेन, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनीही महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे  आश्‍वासन दिले. या वेळी महेश आव्हाड, दत्तू बोडके आदी उपस्थित होते.
नाशिक महापालिकेत दोन महिन्यांपूर्वी आ .कडू आले असता आयुक्तांशी वाद झाला होता. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या जिल्हा परिषद दौर्‍यामुळे जिल्हा परिषदेत प्रचंड  पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेला छावणीचे स्वरूप आले होते. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात चार अधिकार्‍यांना बाजूला बसवूनच  चर्चा झाली. दलनाबाहेरही बंदोबस्ताच्या नावाखाली झालेल्या अतिरिक्त पोलिसिंगमुळे कर्मचारी व ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ  आली.
खर्च करण्याची मानसिकता-कडूआमदार कडू यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर अपंग कल्याण निधीच्या खर्चाचे नियोजन व अपंगांच्या प्रश्‍नांसंबंधी मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपककुमार मिणा यांनी चांगला गृहपाठ व तयारी केल्याचे चर्चे दरम्यान दिसून आले. त्यामुळे चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. बैठकीनंतर आमदार कडू  यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे बघत यांची ’ , मानसिकता निधी खर्च करण्याची असल्यामुळे त्यांना थोडा वेळ देऊ ’, असे स्पष्ट केले.