Breaking News

पतंजलीची वस्त्रोउद्योगात उडी

जयपूर, दि. 28, सप्टेंबर - योगगुरु रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये शिरकाव केला आहे. अंडरवेअरपासून पारंपरिक पोशाख आणि  स्पोर्ट्सवेअर तयार करण्याचा मानस रामदेव बाबा यांनी बोलून दाखवला आहे. परदेशी कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी आचार्य बालकृष्ण आणि रामदेव बाबा यांच्या  पतंजलीने विविध उद्योगक्षेत्रांमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. हर्बल प्रॉडक्ट्सनंतर आता वस्त्रोद्योग क्षेत्रातही पतंजली एन्ट्री करणार आहे. राजस्थानातील  अलवारमध्ये पतंजली ग्रामोद्योगच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबांनी ही माहिती दिली.
हरुन इंडियातर्फे झालेल्या एका सर्वेक्षणात आचार्य बालकृष्ण हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानावर असल्याचं समोर आलं. मात्र आचार्य बालकृष्ण यांनी  मिळवलेला नफा गरजूंच्या मदतीसाठी वापरला जातो, ऐशोआरामासाठी नाही, असा दावा रामदेव बाबा यांनी केला. स्वदेशी कपडे तयार करण्याकडे पतंजलीचा कल  असेल. सुरुवातीला पाच हजार कोटी रुपयांचं सेल्स टार्गेट पतंजलीने ठेवलं आहे. डेनिमसारखे चांगल्या प्रतीचे कपडे ग्राहकांना देण्याची इच्छाही पतंजलीच्या  प्रवक्त्यांनी बोलून दाखवली.