Breaking News

राज्याचे कृषी पर्यटन धोरण जाहीर - जयकुमार रावल

मुंबई, दि. 28, सप्टेंबर - महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आज राज्याचे स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण  जाहीर करण्यात आले. या धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या विविध बाबींची येत्या काळात अंमलबजावणी करून ग्रामीण पर्यटन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण  अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
24 नोव्हेंबर रोजी मुंबई - मालदीव पहिले क्रुझ
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री श्री. रावल म्हणाले, महाराष्ट्रात क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. येत्या  24नोव्हेंबर रोजी मुंबई - कोचीन - मालदीव दरम्यान पहिले कोस्टा क्रूझ प्रवास करणार आहे. या क्रूझमधील अनुभव लक्षात घेऊन नंतर श्रीलंका किंवा इतर  ठिकाणीही क्रूझसेवा सुरू करण्यात येईल. देशात पुढील चार वर्षात साधारण 950 क्रूझ सुरू होणार असून, यापैकी 80 टक्के क्रूझ ह्या मुंबई पोर्टला येतील, अशी  माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्निव्हल ही क्रूझ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनीही भारतात क्रूझ सेवा सुरु करीत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ई - व्हेईकल ते म्हणाले, राज्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ई - व्हेईकल झोन सुरु करण्याबाबत नियोजन करीत आहोत. जेणेकरुन  शाश्‍वत पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण रक्षणासाठीही त्याचा उपयोग होऊ शकेल. राज्यातील कोणत्या पर्यटनस्थळांवरील कोणत्या भागात हे व्हेईकल  झोन सुरु करणे उचीत ठरेल याचा विचार करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात हेरीटेज इमारती आहेत. या इमारतींची माहिती, इतिहास, छायाचित्रे, रचना आदींविषयक माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध करण्यात  येईल. तसेच आयएनएस विराटवर नौदलाचे संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे. आयएनएस विराट संग्रहालयाच्या निर्मितीनंतर वसई-विरार भागात स्थापीत  करण्यासाठी आम्ही केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडे प्रयत्न करीत आहोत. पर्यटन विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी  दिली.मुंबईतील न्यू कस्टम हाऊसला येत्या 29 ऑक्टोबर रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त त्यांना सहकार्य करुन एमटीडीसीमार्फत हेरीटेज रनसारख्या  उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.