Breaking News

मास्टर ब्लास्टर, आदित्य ठाकरे यांच्याकडून भल्या पहाटे ‘स्वच्छता ही सेवा’

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी मंगळवारी सहभाग घेतला. पहाटे पाच वाजता सचिनने आपला मुलगा अर्जुन आणि आदित्य ठाकरे यांच्या साथीने वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात हाती झाडू  घेऊन स्वच्छता केली. या वेळी परिसरातील इतर नागरिकांनीही सचिनबरोबर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वाढदिवशी (17 सप्टेंबर) देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना भाषणातून तर देशातील मान्यवर व्यक्तींना पत्र लिहून  ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
‘देशातील प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपले घर समजले पाहिजे. आपण आपले घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो, त्याप्रमाणे आपण आपला परिसर  आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यसभा खा. सचिन तेंडुलकरने केले.
दरम्यान, या बाबतची छायाचित्रे व्हायरल झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी स्वत: या गोष्टीची दखल घेत ट्विटरच्या माध्यमातून ‘माझा तरूण मित्र’ असे संबोधत  आदित्य ठाकरे यांचे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कौतुक केले आणि अभियानात सहभागी झाल्याबाबत आभार मानले.