Breaking News

’बसपा’ची घडी बसवण्यासाठी मायावती डिसेंबर महिन्यात विदर्भ दौर्‍यावर

नागपूर, दि. 27, सप्टेंबर - विदर्भात पक्षाची बर्‍यापैकी शक्ती असूनही अंतर्गत कुरघोड्यांमुळे बहुजन समाज पक्ष मागे पडला आहे. बसपाची ही विस्कटलेली घडी नीट  बसविण्यासाठी ‘बसपा’च्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती डिसेंबरमध्ये विदर्भाच्या दौर्‍यावर येणार आहेत.
बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी विदर्भातून आपल्या चळवळीला सुरूवात केली होती. देशभर ही चळवळ रुजली. ‘बामसेफ’च्या माध्यमातून वैचारिक चळवळीचा  शुभारंभ केला. पुढे बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. बसपाने देशात आपले वेगळे स्थान निर्माण केले. बसपाध्यक्ष मायावती यांनी उत्तरप्रदेशसारख्या देशातील  मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. मात्र, नंतरच्या काळात बसपाची घडी विस्कटली. विदर्भात व नागपूर शहरात बसपाच्या गडाला खिंडार पडले. याचा फटका  पक्षाला बसला. मात्र, भाजपाच्या लाटेतही बसपाला आपले अस्तित्त्व राखता आले. आता बसपाची संघटनात्मक बांधणी करण्यावर मायावती भर देत आहेत.  त्यासाठी त्या देशव्यापी दौरा करीत असून त्यांतर्गत डिसेंबरमध्ये विदर्भाच्या दौर्‍यावर येणार आहेत. येत्या 10 डिसेंबर रोजी नागपुरात त्यांची सभा होणार आहे. या  सभेचे नियोजन बसपाच्या पदाधिकार्‍यांकडून सुरू आहे़. येत्या 6 ऑक्टोबर रोजी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हे नागपुरात येत असून ते मायावती यांच्या  दौर्‍याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.