Breaking News

पत्रकारिता व साहित्यविश्‍व समृद्ध करणारं साधू व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही - धनंजय मुंडे

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - सिंहासन, झिपर्‍या, मुंबई दिनांक सारख्या दर्जेदार साहित्यकृतीतून महाराष्ट्राचं पत्रकारिता व साहित्यविश्‍व समृद्ध करणारं ‘साधू’ व्यक्तिमत्वं  आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पत्रकारितेतल्या वास्तव अनुभवांना शब्दबद्ध करुन त्यांनी मराठीत अजरामर साहित्यनिर्मिती केली. त्यांच्यासारखे दुसरे ‘साधू’  पुन्हा होणे नाहीत, असा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
श्री. धनंजय मुंडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अरुण साधू हे मराठी पत्रकारिता व साहित्यातले दिपस्तंभ होते. या क्षेत्रात येणार्‍या नवयुवकांसाठी मार्गदर्शक,  प्रेरणास्त्रोत होते. मराठी, इंग्रजी वर्तूळात सहजपणे वावरणारे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, निगर्वी स्वभावाचे अरुण साधू अजातशत्रू होते. त्यांच्या सिंहासन व  मुंबई दिनांक या कादंबर्‍या मराठी साहित्य विश्‍वात मैलाचा दगड ठरल्या. त्यांतून प्रचंड लोकप्रियता, वाचकप्रियता मिळाली. परंतु, लोकांचं, वाचकांचं प्रेम त्यांनी  नेहमीच संयमानं घेतलं. मृत्यूनंतर देहदान करण्याच्या निर्णयातून त्यांनी त्यांचं पुरोगामीत्व अखेरपर्यंत निष्ठापूर्वक जपलं. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो,  अशा शब्दात श्री. मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.