Breaking News

राष्ट्रपती शुक्रवारी नागपूर दौर्‍यावर; सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण; दीक्षाभूमीलाही देणार भेट

नागपूर, दि. 21, सप्टेंबर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने  नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. विमानतळावर स्वागताचा स्वीकार करुन दीक्षाभूमीसाठी प्रयाण करतील.
त्यानंतर माननीय कोविंद हे सकाळी 10.25 वाजता दीक्षाभूमीला भेट देऊन दर्शन करतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने रामटेकसाठी प्रयाण करतील. सकाळी 11.35  वाजता श्री शांतीनाथ जैन मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते रामटेक येथून हेलिकॉप्टरने ड्रॅगन पॅलेस, कामठीकडे प्रयाण करतील.
रामटेक भेटीनंतर दुपारी 12.40 वाजता कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करतील. दुपारी 12. 50 वाजता ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदनेस  उपस्थित राहून दुपारी 12.55 वाजता विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.40 वाजता कामठी  येथून पोलीस मुख्यालयाकडे प्रयाण करतील आणि तेथून राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी 2.20 वाजता राजभवन येथे त्यांचे आगमन होईल. तेथे दुपारी 4  वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील.
त्यानंतर दुपारी 4.15 वाजता नागपूर महानगर पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. सायंकाळी 5 वाजता ते  विमानतळाकडे प्रयाण करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपूर विमानतळ येथून सायंकाळी 5.25 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीसाठी  प्रयाण करतील.