राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकींचा बिगूल वाजला

मुंबई, दि. 02, सप्टेंबर - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7 हजार 576  ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे.  पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील 3 हजार 884, तर दुसर्‍या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित  ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत केली.
ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत राज्याभरातील सुमारे 8,500 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. यापैकी ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत  संपणार्‍या 114 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होत आहे. नोव्हेंबर आणि  डिसेंबर 2017 मध्ये मुदती संपणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणार्‍या 689  आणि नव्याने स्थापित झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.