Breaking News

राष्ट्रीय समाज पक्ष मनपा निवडणुका लढवणार - जानकर

अहमदनगर, दि. 26, सप्टेंबर - नगर शहरामध्ये आगामी मनपा, ग्रामपंचायत निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीनिशी लढवणार आहे. याठिकाणी  उमेदवार उभे  करून , त्यांना चांगले पाठबळ देऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे  अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांनी केले. 
गुलमोहोर रोड येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मंत्री महादेव जानकर बोलत होते. यावेळी  राज्याचे महासचिव बाळासाहेब  दोडतले, हभप सुमंतबापू हंबीर महाराज, नगर जिल्हाध्यक्ष सचिन पाटीलं, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा चौधरी, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ताजुद्दीन मुनियार  आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना.जानकर म्हणाले, नगर शहरामध्ये सावेडी उपनगरात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सभासद नोंदणी, विविध  उपक्रम हाती घेण्यात येणार असून, तसेच जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. या अगोदर नगरसाठी खूपवेळ  दिला परंतु म्हणावे असे यश मिळाले नाही. परंतु यावेळी नव्या जोमाने पुन्हा एकदा कामाला लागून ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका लढवून  पक्षाचे उमेदवार विजयी करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जिद्द, चिकिट व मेहनत घेण्याची तयार असली पाहिजे. नुसती पदे घेऊन मिरवू नका. तर त्या  माध्यमातून पक्षाची, समाजाची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.