Breaking News

अमडापूर बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाला हिरवा कंदिल

जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती श्‍वेता महालेंच्या प्रयत्नांना यश

बुलडाणा, दि. 21, सप्टेंबर - तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या समस्या निवारणासाठी सतत पुढाकार घेणार्‍या भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या व जि. प. महिला व  बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते व कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब  फुंडकर यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून अमडापूर येथिल बस स्थानकाचे आधुनिकीकरण व विस्तारिकरणाच्या कामाला एस. टी.  महामंडळाने मंजूरी दिली आहे. या संदर्भातील पत्र अमरावती येथील कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आले असून एक कोटी 15 लाख रुपयांचे हे काम  लवकरच सुरू होत आहे. 
चिखली तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या अमडापूरशी चिखली, मेहकर व खामगाव तालुक्यातील सुमारे 50 खेडी दैनंदिन व्यवहाराच्या माध्यमातून जोडलेली  आहेत. चिखली-खामगाव मार्गावरील महत्वाचा थांबा असलेल्या अमडापूर येथून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक होत असते. परिणामी अमडापूर येथे  अद्ययावत बस स्थानकाची नितांत आवश्यकता होती. मागील अनेक वर्षांपासून येथे असलेले जुने बस स्थानक अपुरे पडत असून ते मोडकळीस देखील आले आहे.  अश्या बिकट अवस्थेत असलेली सध्याची बस स्थानकाची इमारत प्रवाश्यांसाठी गैरसोयीची व धोक्याची ठरत आहे. अमडापुरच्या रहिवाश्यांनी ही बाब अनेकदा  स्थानिक आमदारांच्या लक्षात आणून दिली. परंतु, आमदारांनी या समस्येकडे साफ दुर्लक्ष केले होते. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या  महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले एक वर्षांपूर्वी अमडापूर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेल्या असता गावकर्यांनी त्यांच्या समोर बस स्थानकाची समस्या  मांडली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्‍वेताताईंनी हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे ठोस आश्‍वासन अमडापुरवासीयांना दिले होते. त्यानुसार श्‍वेताताईंनी आवश्यक  बाबींची पूर्तता करुन हा प्रश्‍न निवेदनाद्वारे शासन दरबारी मांडला. पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांच्या पर्यंत  सदर विषय त्यांनी पोहचवला. एवढ्यावर न थांबता श्‍वेताताई महाले यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांचे फलित म्हणून महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडळाने अमडापूर बस स्थानकाचे आधुनिकीकरण व विस्तारिकरणाच्या कामाला हिरवा कंदिल दाखवला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथिल मुख्यालयातील मुख्य स्थापत्य अभियंता यांनी दि. 11 सप्टेंबर 2017 रोजी या संदर्भातील पत्र अमरावती येथील  कार्यकारी अभियंता यांना पाठवले आहे. या पत्रानुसार अमडापूर बस स्थानकाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाच्या कामाला मंजूरी देण्यात आली असून सदर  बांधकामाची निविदा देखील मंजूर करण्यात आली आहे. प्रस्तावित काम एक कोटी 15 लाख रुपयांचे असून या कामास लवकरच सुरुवात होत आहे. अमडापूरचे  भौगोलिक स्थान व व्यापारि दृष्ट्या महत्व पाहता येथील बस स्थानकाचे नूतनीकरण नितांत गरजेचे होते. ही गरज लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील  शेतकरी, व्यापारी व जनतेची मोठी गैरसोय दूर होणार आहे. हा महत्वाचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावल्याबद्दल ना. फुंडकर व ना. रावते यांचे श्‍वेताताई महाले  पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. अमडापूर बस स्थानकाचा प्रलंबित व बहुप्रतीक्षीत प्रश्‍न जलदगतीने सोडवण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल आमडापूरसह  आसपासच्या ग्रामीण परिसरातील जनतेमधून सुध्दा श्‍वेता महाले यांना धन्यवाद दिले जात आहेत.