Breaking News

रिमोट कंट्रोल नारायण राणे यांच्याकडेच, तेच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतील- नितेश राणे

पुणे, दि. 24, सप्टेंबर - नारायण राणे यांच्याकडे रिमोट कंट्रोल असून ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय योग्य वेळी घेतील, असे आमदार नितेश राणे यांनी  म्हटले आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.राणे हे योग्य वेळ येईल तेव्हा चॅनेल बदलतील, असेही ते म्हणाले. देव जो  आशिर्वाद देईल, तो मान्य करु असे सांगत पुढील राजकीय वाटचालीबद्दल लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आणि जनतेचे  संरक्षण करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असे साकडे देवाला घातल्याचे ते म्हणाले.25 तारखेला नारायण राणे त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार, अशी कुठलीही  माहिती आमच्यापर्यंत पोहचली नसल्याचेही नितेश राणेंनी स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय ही अंतर्गत भूमिका असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  काँग्रेसवर नाराज झालेल्या नारायण राणेंनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र आता ते नवा पक्ष स्थापन करणार की भाजपमध्ये प्रवेश करणार,  याबाबत अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे.