Breaking News

सर्वच शिक्षक हे पुरस्कारासाठी पात्र - महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे, दि. 28, सप्टेंबर - विद्यार्थांच्या जडणघडणीत शिक्षकाचा सर्वात मोठा वाटा असून जीवनात येणारे सर्वच शिक्षक हे आदर्श शिक्षक असून ते सर्वच शिक्षक हे  पुरस्कारासाठी पात्र आहे असे मत महापौर मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले.राम गणेश गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ’आदर्श  शिक्षक महापौर पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या .
महापालिका शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात असून सद्यस्थितीत राजकारणामध्ये उच्च पदावर कार्यरत असणार्‍या व्यक्ती ह्या ठामपा शाळेत शिकलेल्या असून त्याचा  आम्हाला अभिमान वाटतो . तसेच ठामपाच्या सेवेत असणार्‍या शिक्षकांचे बरेच प्रश्‍न मार्गी लावले असून येणार्‍या काळात शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर ठोस निर्णय घेतले  जातील असेही त्यांनी सांगितले .यावेळी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठामपा शाळेतील शिक्षकांनी आपली शाळा ,शाळेभोवतालचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता  मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांना एक दिवस सुट्टी देऊन आपण स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन फक्त  दिखाव्यातून स्वच्छता न दाखवता प्रत्यक्ष कार्यातून स्वच्छता दाखवावी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन करताना पालिका क्षेत्रातील गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आपली असून  समाज घडवण्याचे काम या निमित्ताने होत असते असे सांगितले. यापुढेही महापालिकेच्या वतीने चांगले शिक्षण देण्याचे काम सुरु राहील असे त्यांनी सांगतानाच  शिक्षकांनी ती आपली जबाबदारी पार पाडावी असेही त्यांनी सांगितले. शिक्षक गौरव दिन सोहळ्यानिमित्त श्रीमती प्रतिभा भराडे विस्तार अधिकारी कुमठे बीट सातारा  यांनी ’ज्ञानरचनावाद ’ या विषयावर उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले . प्रत्येक मुलं हे युनिक असून त्यांना त्यांच्या कलेने शिकू द्यावे.मुलांना कशा पद्धतीने  शिकवले पाहिजे,त्यांच्याशी कसा संवाद साधावा, सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा मुलाच्या जडण घडणावर कसा परिणाम होतो. आदी विषयावर श्रीमती  भराडे यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षक गौरव दिन सोहळ्यानिमित्त एकूण 14 शिक्षकांना ’आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ देण्यात आले आहे .यामध्ये आशालता घाटगे (शाळा क्र 44 ), मनीषा  लोहोकरे(ठामपा माध्यमिक शाळा क्र 1 ) ,निर्मला राजेश शेंडे ( शाळा क्र 102 किसननगर ), प्राची संजय तळगावकर (शाळा क्र.10 मानपाडा), अरुंधती किशोर  डोमाळे (शाळा क्र.18 ज्ञानसाधना ), विद्या रामदास फुलसुंदर ((शाळा क्र.23किसननगर ), दिलशाद अकबर शेख (शाळा क्र.22 सावरकरनगर), निशा श्याम संखे  (शाळा क्र.58 भाईंदरपाडा), हर्षदा हेमंत वर्तक (शाळा क्र.97 गायमुख ), लुबना तकी शेख (शाळा क्र.113 मुंब्रा), मनीषा भाऊसाहेब डुकरे (ज्ञानदीप विद्यालय  ,मुंब्रा ), मंजितकौर देवेन्द्र अस्थाना (एसईएस हायस्कूल पाचपाखाडी ), प्रतिभा सूर्यकांत महाडिक (शाळा क्र.80 साबे ), अस्मिता अनिल पाठक( शाळा क्र.102  ), आदी शिक्षकांना महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ’आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. ’आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ या सोहळ्याला  नगरसेविका संध्याताई मोरे, नगरसेविका श्रीमती.जोशी, उप आयुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, लेखाधिकारी भरत राणे, यांच्यासह सर्व शाळेचे  मुख्याध्यापक,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.