Breaking News

योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच जणांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

लखनौ, दि. 09, सप्टेंबर - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व दिनेश शर्मा , परिवहन मंत्री स्वतंत्रदेव सिंग यांची आज विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. या बरोबरच राज्यमंत्री मोहसिन रजा यांचा उमेदवारी अर्ज छाननीत योग्य आल्याने त्यांचीही निवड झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांविरोधात विरोधी पक्षाकडून एकही उमेदवार उभा करण्यात आला नाही.
मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या पाच जणांना एखाद्या सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य होते. 19 सप्टेंबर रोजी हा सहा महिन्यांचा कालावधी संपणार होता. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली.
योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 6 जुलै 2022 पर्यंत आहे. तर उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा व परिवहन मंत्री स्वतंत्रदेव सिंग यांचा कार्यकाळ 30 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे.