Breaking News

‘अच्छे दिन’ चे आश्‍वासन फोल ठरले - खा. श्रीरंग बारणे

पुणे, दि. 24, सप्टेंबर - निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्य सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्‍वासन फोल ठरले आहे. जनतेला याचा पश्‍चाताप होत आहे, अशी टीका  खा. श्रीरंग बारणे यांनी पिंपरी येथे केली.
पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस यांच्या किंमती रोज वाढत असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा रोज आत्महत्या  करत असताना राज्य सरकार फक्त कागदोपत्री कर्ज माफीची घोषणा करत आहे. अद्यापही त्यांनी कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर केलेली नाही.  जीडीपीचा दर घसरत आहे, असेही बारणे म्हणाले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र व राज्य सरकारचा वाढत्या महागाईविरोधात निषेध  करण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.या वेळी शिवसेना शहरप्रमुख व गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, जिल्हा  संघटक सुशिला पवार, आमदार ड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक अमित गावडे, सचिन भोसले, निलेश बारणे, नगरसेविका रेखा दर्शिले, मीनल यादव, अश्‍विनी  वाघमारे, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, विजया जाधव, पिंपरी  विभाग संघटक योगेश बाबर, पिंपरी विधानसभा समन्वयक रोमी संधू, चिंचवड विधानसभा समन्वयक गजानन चिंचवडे, चिंचवड विभाग संघटक वैशाली मराठे, आशा  भालेकर, भोसरी विधानसभा समन्वयक विनायक रणसुभे, शिवव्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले, कार्यालयीन सचिव ज्ञानेश्‍वर शिंदे, युवा सेना अधिकारी सचिन  सानप, राकेश वाकुर्डे, भोसरी समन्वयक युवराज कोकाटे आदींसह शेकडो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना शहरप्रमुख गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, फसव्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आज  राज्यभर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरण्याचा आदर्श घालून दिला  आहे. मागील 3 वर्षात सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. कष्ट करून पै-पै जमवून, कर्ज काढून गरजेसाठी दुचाकी वापरणारेदेखील आता सरकारच्या  दृष्टीने श्रीमंत आहेत. सरकारचे डोके ठिकाणावर नाही, ते ठिकाणावर आणण्यासाठी आणि सामान्य जनतेचा आवाज उठविण्यासाठी, जनतेच्या भावना मांडण्यासाठी,  शिवसेना नेहमी रस्त्यावर येईल. महागाईने जनतेला वेठीस धरले आहे. सोशल मीडियातुन देखील जनतेचा रोष वाढत आहे. सेनेने कायम जनतेच्या बाजूने लढा  उभारला आहे, असेही कलाटे म्हणाले.