Breaking News

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातील दोन कक्षांना सील !

सिरसा, दि. 09, सप्टेंबर - सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातील दोन कक्ष तपास पथकाने बंद केले आहेत. शोधमोहिमेत तपासपथकाने मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि बनावट नोटा जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेल्या नोटा मोजण्यासाठी बँक कर्मचा-यांनाही बोलाविण्यात आले आहे.
निमलष्करी दलाचे जवान आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या पहिल्या पथकाने राम रहीमच्या मीडिया मॉनिटरिंग कक्षातून लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्ड डिस्क आणि अन्य साधने जप्त केली आहेत. तर दुसरे पथक ध्यान सभागृह, चर्चा घर, प्रिंटींग प्रेस आणि अतिथीगृहाचा तपास करत आहेत.
या शोध मोहिमेत 41 निमलष्करी तुकड्या, 4 जिल्ह्यांतील पोलीस आणि एका श्‍वानपथकाचा समावेश आहे. जवानांच्या मदतीसाठी मुख्यालयाबाहेर बॉम्बनाशक आणि शोधक पथकही तैनात करण्यात आले आहे. सतनाम सिंह चौकापासून डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयापर्यंतचा 8 किलोमीटरचा रस्ता बंद करण्यात आला आहे.