Breaking News

नरेंद्र मोदींना आपण दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला - राज ठाकरे

मुंबई, दि. 22, सप्टेंबर - लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसर पडला आहे . मोठ्या अपक्षेने सत्तेवर  आलेल्या मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी  येथे केली . 
राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजचे अनावरण रवींद्र नाट्य मंदिरात एका कार्यक्रमात करण्यात आले . त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली . ते म्हणाले की मोदी हे देशाचा विकास करतील अशा अपेक्षेने मतदारांनी त्यांना सत्तेवर  बसवले. गुजरातमधील त्यांचे काम पाहूनच मी , मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत ’अशी भावना व्यक्त केली होती . मोदी पंतप्रधान व्हावेत असे जाहीरपणे बोलणारा  मी पहिला होतो . मात्र तीन वर्षातील मोदी सरकारचा कारभार अत्यंत निराशाजनक आहे. सत्तेवर येण्यापूर्वी मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांचा मोदींना विसर पडला  आहे .
ते म्हणाले की , मोदी सरकारने गाजावाजा करून अनेक योजना जाहीर केल्या. मात्र या योजनांमधून सर्वसामान्य माणसाला काहीच मिळाले नाही . मेक इन इंडिया ,  स्वच्छ भारत अशा अनेक योजना सुरु झाल्या . मेक इन इंडिया मधून किती रोजगार मिळाले ? अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधायला गेलो तर हातात काहीच लागत  नाही.त्यामुळे मोदी सरकारविषयी माझ्यासकट अनेकांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे.  या वेळी राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरही जोरदार टीका केली .  नागरिकांची गरज पाहता मुंबई दिल्ली अशा मार्गावर बुलेट ट्रेनची गरज होती . प्रत्यक्षात मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरु केली गेली . या मागे मुंबईतील मराठी  माणसाला उध्वस्त करण्याचा डाव आहे असा आरोपही राज ठाकरे यांनी केला .