Breaking News

पैठण येथे गोदावरीतून काढला पाच टन कचरा

औरंगाबाद, दि. 13, सप्टेंबर - गोदावरी नदी स्वच्छ करण्याच्या तहसीलदार महेश सावंत यांच्या आवाहनाला पैठणकरांनी चांगला प्रतिसाद दिला. गोदावरी नदी  स्वच्छता मोहिमेत जवळपास दोनशे नागरिकांनी सहभाग घेतला.त्यांनी सुमारे पाच टन कचरा बाहेर काढून नदीपात्र स्वच्छ केले. जायकवाडी धरणावरील जलविद्युत  केंद्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे केंद्रातून गोदावरी नदीत पाणी सोडणे व सोडलेले पाणी परत ओढून घेण्याची प्रक्रिया बंद आहे. परिणामी, तीन  महिन्यांपासून संत एकनाथ महाराज समाधी मंदिरामागील नदीपात्र दूषित होऊन पाण्याला दुर्गंधी येत आहे. गणेश विसर्जनादिवशी पैठणचे तहसीलदार महेश सावंत  यांनी नाथसमाधी मंदिरामागील नदीपात्राला भेट दिली. त्यावेळी त्यांना गोदावरी नदीची दूरवस्था दिसली. त्यांनी गोदावरी नदी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय  घेतला. यासंबंधी सोशल मीडियाच्या माध्यमातून पैठणकरांना आवाहन करण्यात आले. तहसीलदार सावंत यांच्या आवाहनाला पैठणकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या  मोहिमेत शहरातील जवळपास दोनशे नागरिक सहभागी झाले. गोदावरी नदीतून जवळपास पाच टन ओला कचरा बाहेर काढण्यात आला.