सलग दुस-या दिवशीही मराठवाड्यातील रेल्वेसेवा विस्कळित
औरंगाबाद, दि. 01, सप्टेंबर - मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाने तसेच दुरांतो एक्स्प्रेस घसरल्याने मराठवाड्याच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे मुंबईकडून येणा-या आणि मुंबईकडे जाणा-या रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. सलग दुस-या दिवशीही रेल्वेप्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अतिवृष्टीने नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव- वासीनाड स्थानकावर घसरल्याने मराठवाड्याच्या सर्वच रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या बुधवारी (ता. 30) आणि गुरुवारी (ता. 31) नांदेडहून मुंबईकडे जाणा-या आणि येणा-या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस’ व मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही गाडीही रद्द करण्यात आली. जालना - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस’ ही गाडी मनमाडपर्यंत धावली. त्यानंतर तिचा परतीचा मनमाड - जालना हा प्रवास विशेष रेल्वेगाडी म्हणून होता. लोकमान्य टिळक टर्मिनन्स मुंबई ते नांदेड ही गाडी रद्द करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी (ता. 31) निघणारी नांदेड ते मुंबई (गाडी क्रमांक 11012) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे.