Breaking News

तूर खरेदी प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई : जिल्हाधिकारी

हिंगोली, दि. 03, सप्टेंबर - जिल्ह्यत तूर खरेदीच्या एकूण प्रकरणात संपूर्ण चौकशी करून दोषी विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निकषात बसूनही ज्यांची  तूर खरेदी झाली नाही त्याबाबतही खरेदी होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळास दिले. तूर खरेदी प्रकरणात खा. राजीव सातव यांनी काही शेतक-यांसह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन तूर खरेदीत झालेल्या  गैरप्रकाराची व तूर खरेदीपासून वंचित असलेल्या शेतकर्यांच्या मुद्यावर चर्चा केली. ज्या शेतक-यांची नावे यादीत नाहीत, त्यांनी घोषणापत्र दाखल केले नाही. अशा  शेतकर्यांची तूर खरेदी केली गेली, मात्र घोषणापत्र देऊनही अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित आहेत. त्या शेतकर्यांना शासनाने न्याय द्यावा, अशी भूमिका  खासदार सातव यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडली.यावर जे शेतकरी पात्र ठरतात व जे खरेदीपासून वंचित आहेत त्यांची तूर खरेदी केली जाईल. सकाळीच तूर  खरेदीच्या प्रश्‍नावर जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सचिवासोबत चर्चा करून सविस्तर माहिती मागविली असल्याचे त्यांनी सांगितले.