Breaking News

जळगावात मिशन इंद्रधनुष अंतर्गत 7 ऑक्टोबरपासून लसीकरण मोहीम

जळगाव, दि. 30, सप्टेंबर -  राज्यातील 9 जिल्हे व 13 महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये 7 ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतंर्गत लसीकरणाची मोहीम  राबविण्यात येणार आहे. लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे  आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केले. मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मुख्य सचिवांनी  जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.
राज्यात 9 जिल्हे व 13 महापालिका क्षेत्रात 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 0 ते 2 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात  येणार आहे. सध्या महापालिका / नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे ते येत्या दोन ते  तीन दिवसात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.
नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, बीड, नांदेड, सोलापूर, जळगाव, ठाणे, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच मालेगाव, जळगाव, ठाणे, उल्हासनगर, मुंबई,  नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भाइंदर, सोलापूर, नांदेड या 13 महापालिका क्षेत्रामध्ये ही मोहीम घेण्यात येणार आहे. ज्या  महापालिका क्षेत्रात लसीकरणासंबंधी बालकांचा सर्वे अद्याप पूर्ण झालेला नाही तो तातडीने पूर्ण करावा. भिवंडी, मालेगाव या भागांमध्ये लसीकरण मोहिमेला प्रतिसाद  चांगला मिळण्याकरिता नगरसेवक तसेच मौलवींची भेट घेऊन त्यांना सहभागी करून घ्यावे. यासाठी जाणीव जागृतीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लसीकरणाने टाळता  येणार्‍या आजारांमुळे बालमृत्यू होऊ नये यासाठी इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.