Breaking News

तूर खरेदी घोटाळा प्रकरणी 7 व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल

बुलडाणा, दि. 24, सप्टेंबर - शासकीय तूर खरेदीतील गैरव्यवहारामुळे 7 व्यापार्‍यांवर 20 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे संग्रामपूर येथील तूर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आता 7 व्यापारी, खविसंचे प्रभारी व्यवस्थापक आणि 12 संचालकांवर गुन्हा दाखल झाल्याने आरोपींची संख्या 20 वर पोहोचली आहे. 
संग्रामपूर येथे शासकीय तूर खरेदीमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमिततेप्रकरणी तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर व प्रभारी व्यवस्थापकावर फौजदारी कारवाई करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह 20 सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या दिला.
‘दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपयर्ंत उपनिबंधक चव्हाण यांना खुर्चीतून हलु देणार नाही’ अशी आंदोलनात्मक भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली. त्यामुळे  उपनिबंधक  चव्हाण यांनी जळगाव जामोदचे सहाय्यक निबंधक अंभोरे यांना तामगाव पोलीस स्टेशनमध्ये संचालक मंडळाविरोधात तक्रार देण्यासाठी रवाना केले. दरम्यान, सहायक निबंधक अंभोरे यांनी 20 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा खविसंच्या 12 संचालकांविरोधात व प्रभारी व्यवस्थापकाविरोधात तामगाव पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये संग्रामपूर येथील 7 शेतकर्‍यांचाही समावेश होता. संबंधित व्यापार्यांनी शेतकर्‍यांच्या  नावे विकलेल्या तुरीच्या मालाच्या पैशाचा धनादेश स्वत:च्या नावे उचलणे असे तक्रारीत नमूद करण्यात आले. दरम्यान, उपरोक्त 7 व्यापार्‍यांनी विनाटोकन तूर खरेदी करीत, शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर स्वत:ची तूर विक्री केल्याचे उघडकीस आले. परिणामी, व्यापारी पीयूष अग्रवाल, हरीश जुगलकिशोर राठी, ओमप्रकाश पालीवाल, उमेश टावरी, देवकिसन खुशालचंद राठी, कृष्णा कुटे, कमल तुळशिराम गांधी या सात व्यापार्‍यांवर व खविसंचे 12 संचालक व प्रभारी व्यवस्थापक असे एकूण 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.