Breaking News

राज्यात 40 टक्के सिंचन झाल्यास आत्महत्या थांबतील - नितीन गडकरी

नागपूर, दि. 24, सप्टेंबर - वर्तमानात राज्यात केवळ 23 टक्के सिंचन आहे. यात वाढ होऊन 40 टक्क्यांपर्यंत सिंचन झाल्यास राज्यातील शेतकरी आत्महत्या  थांबतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, राज्यातील अनेक नद्यांचे पाणी समुद्रात मिळते त्यामुळे ते वाया जाते. त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. ते पाणी इतर  नद्यांकडे वळविल्यास पाण्याचा प्रश्‍न सुटू शकतो दमणगंगेचे पाणी गोदावरी नदीत वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या खोर्‍यात येणारा  उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील पाणी टंचाई संपेल. जायकवाडी प्रकल्पा नेहमी पाण्याने भरलेला राहील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे केंद्र उघडणार
विदर्भात सध्या उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस आले आहेत. याआधी विदर्भातील साखर कारखाने चालू  शकले नाही. मात्र, आम्ही तीन साखर कारखाने हाती घेऊन उत्तमरित्या चालवून दाखविले आहेत. आता शेतकजयांना उसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी माहिती  देण्याची गरज आहे. त्यासाठी शरद पवार यांच्याशी आपले बोलणे झाले असल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत. त्यांनी  विदर्भात त्याचे केंद्र सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. त्यासाठी गोसिखुर्द प्रकल्पाच्या क्षेत्रात 45 एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. तेथे हे केंद्र सुरू करण्यात  येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
विदर्भात बांबूपासून कपडे बनविणार
विदर्भात बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र त्याचा पाहिजे तसा उद्योगासाठी वापर केला जात नाही. आता मेळघाटातील संपूर्ण बांबू प्रकल्पामध्ये  बांबूपासून शर्ट तयार करण्यात आला आहे. तो अत्यंत सुंदर आणि नरम आहे. त्यामुळे बांबूपासून असे कपडे बनविण्याचा उद्योग विदर्भात सुरू करणार असल्याचे  गडकरी यांनी सांगितले.
यावेळी गडकरी म्हणाले की, बांबू पासून तयार करण्यात आलेला शर्ट आपण नुकताच पाहिला. हा शर्ट मेळघाटातील प्रकल्पात बनविण्यात आला आहे. आता त्याही  पुढे जाऊन बांबूपासून पॅण्ट, ब्लँकेट, चादरी आणि इतर कपडे तयार करण्याचे काम या प्रकल्पात सुरू आहे. त्यासाठी सुनील देशपांडे यांची मदत घेण्यात आली  आहे. भविष्यात विदर्भात यावर आधारीत मोठा प्रकल्प उभारणार असल्याचे ते म्हणाले. बांबूपासून अनेक वस्तू तयार करता येतात. पण आपण त्याचा पाहिजे तसा  वापर करत नाही. घरातील प्रत्येक साहित्य बांबूपासून तयार करता येते. त्यावर अधिक भर देणार असल्याचे ते म्हणाले. बांबूपासून घराचे छत आणि टाइल्ससुद्धा  तयार करता येतात. आपल्याला बांबूच्या अनेक वस्तू विदेशातून आयात कराव्या लागतात. त्या जरआपणच आपल्या देशात बनविल्या तर मोठा फायदा होऊ शकतो  त्यामुळे यापुढे बांबूची लागवड वाढवून त्यापासून विविध वस्तू बनविण्याचा प्रकल्प उभारणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.