Breaking News

31 लाख शेतकर्‍यांनी कर्जमुक्तीचे अर्जच भरले नाहीत ?

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेसाठी 31 लाख शेतकर्‍यांनी अर्जच सादर केले नसल्याची माहिती उघड झाली आहे . कर्जमुक्ती  योजनेसाठी अर्ज सादर करण्याची काल (दि. 22) अंतिम मुदत होती . कालपर्यंत 58 लाख शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले . या  योजनेची घोषणा करताना राज्यातील 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळेल असे सांगण्यात येत होते . मात्र सरकारकडे दाखल झालेल्या अर्जाची  संख्या पाहता एवढ्या मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी हे अर्ज का दाखल केले नाहीत असा प्रश्‍न उपस्थित होत आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 40  लाख शेतकर्‍यांचा सात बारा कोरा होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी सरकारने अनेक अटी घातल्या होत्या . कोणत्याही स्थितीत या योजनेचा गैरफायदा  कोणी मिळवू नये या उद्देशाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला .त्यामुळेच अनेक बोगस शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले नसावेत  असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोणत्याही स्थितीत गरजू शेतकर्‍यांनाच कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने राज्य सरकारने या योजनेसाठीची  प्रक्रिया राबवली . 2008- 09 साली जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेत अनेक धनदांडग्या शेतकर्‍यांनी तसेच काही बँकांनी हात धुवून घेतल्याचे दिसले होते .  यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कडक निकष ठेवण्यात आले होते . त्याची अंमलबजावणीही त्याच पद्धतीने करण्यात आली .