Breaking News

वल्गना नको, सत्तेतून बाहेर पडून दाखवा - आ. रवि राणा

नागपूर, दि. 24, सप्टेंबर - उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत असून त्यांच्या पाठीशी शिवसैनिक देखील उभे नाहीत. सत्तेत राहून सरकारवर टीका करण्याऐवजी  त्यांच्यात हिंमत असेल तर दसर्‍याला सरकारमधून बाहेर पडावे असे आव्हान अपक्ष आमदार रवि राणा यांनी आज शिवसेनेला दिले. राणा यांच्या वाहनावर दगडफेक  झाल्यानंतर ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
आ. रवी राणा यांची एमएच 27 बीई 1 क्रमांच्या फॉर्च्युन गाडी बडनेराहून नागपूर विमानतळाकडे जात होती. वडधामना नजीक त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक  केली. त्यावेळी गाडीत आमदार रवी राणा नव्हते. आ. राणा यांनी दसर्‍यानंतर शिवसनेना फुटणार असल्याचा 22 सप्टेंबर रोजी केलेला गौप्यस्फोट आणि त्यानंतर  आज,शनिवारी त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेली दगडफेक याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. यासंदर्भात नागपुरात  परतल्यावर आ. राणा यांना संपर्क केला असता त्यांनी उद्धव आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नाही. कारण आम्ही सहा अपक्ष आमदार देवेंद्र  फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. इतकेच नाही तर शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही. शिवसेनेने फडणवीस  सरकारचा पाठिंबा काढताच सेनेचे 20 ते 22 आमदार हातातले शिवबंध मातोश्रीवर तोडून मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल होतील, असा इशारा  त्यांनी दिला. तसेच उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत असून ते केवळ पोकळ वल्गना करतात. त्यांच्यात हिंमत असेल तर शिवसेनेने दसर्‍याला खरोखर सत्तेतून बाहेर  पडून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले.