Breaking News

रायगडात वाहनचोरांचा सुळसुळाट; दिड वर्षात 239 तक्रारी दाखल

अलिबाग दि. 25, सप्टेंबर - रायगड जिल्ह्यात वाहनचोरांचा सुळसुळाट झाला असून गेल्या दीड वर्षात वाहन चोरीची तब्बल 239 तक्रारी दाखल करण्यात आल्या  आहेत. जिल्हा माहिती कार्यालयातील एका अधिका-याने ही माहिती दिली. या पैकी केवळ 58 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे वाहन  चोरांना रोखण्याचे रायगड पोलिसांसमोर नवे आव्हान आहे.
रायगड जिल्ह्यात 2016 मध्ये वाहन चोरीच्या 138 घटना घडल्या. यातील 31 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 2017 मध्ये ऑगस्ट महिना  संपेपर्यंत जिल्ह्यात वाहन चोरीची 101 प्रकरणे नोंदवण्यात आली. यातील 27 प्रकरणांचा छडा लागला.
पेण, कर्जत, खालापुर, आणि अलिबाग तालुक्यांमध्ये वाहन चोरीचे प्रमाण जास्त आहे. कर्जत आणि नेरळ परीसरात गेल्या दिड वर्षात 63 गुन्हे दाखल झाले आहेत.  यातील 25 टक्के गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली नाही. या शिवाय गेल्या दिड वर्षात पेण 28, खोपोली येथे 22, अलिबाग येथे 18, रोहा येथे 12, खालापूर येथे  11, महाड एमआयडीसी येथे 12 वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत आणि अलिबाग वगळता इतर सर्व ठिकाणी या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प  असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.