Breaking News

वादळाच्या तडाख्यात हडपसरमध्ये 16 वीजखांब, वाहिन्या जमीनदोस्त

पुणे, दि. 30, सप्टेंबर - शहरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसाच्या तडाख्याने तसेच वीजतारांवर झाडे आणि फांद्या पडल्याने हडपसर परिसरातील 4 वीजवाहिन्यांचे 16 वीजखांब आणि त्यावरील वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू झाली आहे. या वादळाच्या तडाख्यात वीजयंत्रणा नादुरुस्त झाल्याने हडपसर गाव व सोलापूर रोड परिसरातील सुमारे 22 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सुमारे 18 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी सुरू करण्यात आला आहे. तर, उर्वरित भागातील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून रात्री सुरू करण्यात येत आहे.
बंडगार्डन विभाग अंतर्गत हडपसर इंडस्ट्रीयलमधील हेन्ले 22 केव्ही उपकेंद्रातून रामटेकडी, सेंट मेरी, हेन्ले 1 व 2 अशा 22 केव्हीच्या 4 ओव्हरहेड वाहिन्यांद्वारे हडपसर गाव, हडपसर मार्केट, साडेसतरानळी, सातववाडी, शिंदेवस्ती, रामटेकडी, सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, बी.टी. कवडे रोड आदी परिसरात वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास वादळ आणि मुसळधार पावसामुळे या चारही वीजवाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळल्या. वीजवाहिन्यांवर ताण आल्याने वीज वाहिन्यांवरील 16 वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. महावितरणाचे अभियंता आणि कर्मचार्यांनी तातडीने खाली पडलेल्या वीजवाहिन्यांची पाहणी करून त्यात सार्वजनिक सुरक्षेचा धोका नसल्याची खात्री केली. त्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनीही सूचना करून पर्यायी व्यवस्थेतून संबंधीत परिसरात वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले. कोसळलेले वीजखांब आणि वाहिन्या उभारण्यासाठी तातडीने काम सुरू करण्यास सांगितले.
सायंकाळपर्यंत 22 केव्ही रुबी हॉल वीजवाहिनीवरून नादुरुस्त झालेल्या सेंट मेरी आणि रामटेकडी वीजवाहिनीवरील ग्राहकांना वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणीही पर्यायी सोय उपलब्ध करून हडपसर इंडस्ट्रीयल, हडपसर मार्केट, रामटेकडी इंडस्ट्रीयल, सातववाडी, मगरपट्टा, सेंट मेरी आदी भागातील सुमारे 18 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर शिंदेवस्ती, साडेसतरानळीचा काही भाग, बी. टी. कवडे मार्ग, गाडीतळ या परिसरातील ग्राहकांचाही वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरू करण्यात येत असून, रात्री उशिरा त्याचे काम पूर्ण होईल.
दरम्यान, वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेले वीजखांब आणि वाहिन्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून, येत्या 2 दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल. या कालावधीत पर्यायी व्यवस्थेतून भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर हडपसर, सोलापूर रोड, मगरपट्टा, रामटेकडी आदी परिसरात नाईलाजास्तव दोन ते तीन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेची दुरुस्ती आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत चव्हाण यांच्यासह सुमारे 55 अभियंते आणि कर्मचारी कार्यरत आहेत.