Breaking News

जिल्ह्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढली

नांदेड, दि. 08, ऑगस्ट - जिल्ह्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढत असून शहरालगत असलेल्या सिडको व बळीरामपुर येथे दोन डेंग्यू संशयीत रूग्ण आढळल्याने  खळबळ उडाली असून सिडको येथे मनपाच्या आरोग्य पथकाने रूग्णाच्या घराची पाहणी केली असता डेंग्यूच्या आळ्या निदर्शनास आल्याने त्या ठिकाणी धुर फवारणी  करण्यात आली.
ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ताप येणे, डोके दुखी, सर्दी आदी रूग्णांची संख्या वाढल्याने शहरातील रूग्णालय  हाऊसफुल झाली आहेत. शहरालगत असलेल्या सिडको भागात 1 ऑगस्ट रोजी एका 11 वर्षीय बालकास ताप येत असल्याने उपचारासाठी खाजगी रूग्णालयात  दाखल करण्यात आले होते. सदरील रूग्णाची तपासणी केली असता डेंग्यू संशयीत असल्याचे दिसून आले. तर 6 ऑगस्ट रोजी बळीरामपुर येथील एका 11 वर्षीय  बालकास ताप, डोके दुखी होत असल्याने शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरील रूग्णास डेंग्यूचे लक्षण असल्याचे निदर्शनास  आल्याने डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात पाठविले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.