Breaking News

बुलडाणा जिल्हा विदर्भात पहिला तर महाराष्ट्रात तिसर्‍या क्रमांकावर

क्रीडामंत्री मा.विनोद तावडे यांनी जिल्ह्याच्या कामगिरीची केली प्रशंसा

बुलडाणा, दि. 24 - भारतात पहील्यांदाच फीफाद्वारे फुटबॉलचा 17 वर्षाखालील मुलांचा विश्‍वचषक आयोजित होत आहे. जगात सर्वात जास्त खेळल्या जाणार्‍या या  क्रीडा प्रकारात भारताचे रँकींग 96 वे आहे. त्यामुळे या विश्‍वचषकाच्या निमित्ताने देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे व जास्तीत जास्त खेळाडू मैदानावर  यावेत, त्यांना खेळाची गोडी निर्माण होवून शरीर देखील तंदुरुस्त व्हावे व त्याच बरोबर फुटबॉल या क्रीडा प्रकारात आपल्या देशाने दर्जेदार कामगिरी करावी म्हणून  मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी आवाहन केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व क्रीडा मंत्री  विनोद तावडे यांच्या संकल्पनेने महाराष्ट्र राज्यात फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन अर्थात अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय हे  अभियान राबविण्यात येत आहे.  त्यानुसार राज्यातील सर्व शाळांना आपल्याकडे असलेल्या फुटबॉल या खेळाच्या सुविधा व शाळेबाबत माहिती ऑनलाईन सादर  करण्यासाठी एक लींक देखील देण्यात आलेली होती. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जावून  तेथील क्रीडा शिक्षकांच्या सभा घेवून या अभियानाबाबत व फुटबॉल या खेळाच्या प्रसाराबाबत माहिती दिली आहे.  तसेच बुलडाणा जिल्हा फुटबॉल संघटनेच्या  पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेवून हे अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नियोजन व त्यास जिल्ह्यातील सर्व  क्रीडा शिक्षकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व फुटबॉल संघटनेचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ 90 टक्के शाळांनी पुढाकार घेवून सदर माहिती शासनाने  दिलेल्या लींकवर ऑनलाईन सादर केली.  तसेच तालुका व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदविला, अशी कामगिरी करणारा बुलडाणा हा  विदर्भातील पहिला व राज्यातील तिसरा जिल्हा ठरला आहे.  दि. 20 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे मा.ना.विनोद तावडे क्रीडा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या  अध्यक्षतेत झालेल्या आढावा बैठकीत याचे सादरीकरण जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. त्यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या  या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यात त्यामुळे फुटबॉलमय वातावरण होण्यास निश्‍चीतच बळ मिळणार आहे.
या अभियानाची पुढील आयोजन म्हणून दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी संपुर्ण राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमध्ये आंतरवर्ग फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळविण्यात  येणार असुन, त्यासाठीच्या सुचना शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत संबंधीतांना शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.  तसेच ज्या शाळांनी  सदर लींकवर ऑनलाईन माहिती सादर केली आहे, त्या शाळांना शासनाच्या वतीने प्रत्येकी 3 फुटबॉल देण्यात येणार आहे.  तरी सर्व संबंधीत शाळांनी आपल्या  शाळेतील किमान 10 मुला-मुलींचे संघ तयार करुन त्यांच्यात फुटबॉल आंतरवर्ग सामने घेण्यासाठी पूर्वतयारी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर  पाटील यांनी केले आहे.