Breaking News

गणराया सर्वांना सद्बुध्दी दे..

। स्वातंत्र्यासाठी झटणार्‍या पुढार्‍यांच्या मनामधील उत्सव पुन्हा साजरा व्हावा

अहमदनगर, दि. 24 - आपल्याकडील बदललेल्या सार्वजनिक उत्सवांना हिडीस रुप प्राप्त झाले आहे. हे किती योग्य व किती अयोग्य हा तसा विचारमंथनाचा भाग होवून बसला आहे. आता पुणे नगरपालिकेमध्ये यंदा महानगरपांलिकेवर भाजपची सत्ता असून यंदाच्यावर्षी  गणेशोत्सवाला  सव्वाशे  वर्ष  पूर्ण  होत आहे. यातून गणेशोत्सवाचा नवीन वाद निर्माण झाला आहे.  यातून गणेशोत्सवाचे जनक कोण आहे हा प्रश्‍न पुढे आला आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी पहिला गणेशोत्सव सुरु केला की टिळकांनी हा वाद निर्माण झाला आहे.  हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गणरायाचा उत्सव आणि साहित्य संमेलन हे एका बाबतीत साम्य दाखवत आहेत. कुठला तरी वाद झाल्याशिवाय या दोन्ही उत्सवांना रंगत येत नाही असाच काळ आहे. सध्या पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा सव्वाशेवा वाढदिवस महापालिकेच्यावतीने साजरा केला जात आहे. या सोहळ्याचा लोगो करण्याच्या मुद्यावरून सध्या विद्वानाच्या या नगरीत मोठा गदारोळ सुरु झाला. या सोहळ्याच्या लोगोमधून लोकमान्य टिळकांचे छायाचित्र काढून तिथे गणपतीचा फोटो लावल्याबद्दल अनेकांचा आक्षेप असल्याचा कांगावा करण्यात आला. यातून श्रेय कुणाला द्यायचे हा प्रश्‍न असला तरी पहिला गणपती उत्सव हा भाऊसाहेब रंगारी यांनीच सुरु केला आहे. आता टिळक यातून मागे पडले असले तरी गणेशोत्सवाच्या  काळात गणपती मंडळे ही याआधी टिळकांचा उत्सव म्हणून फोटो लावत होते. आता मात्र भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो मंडळे लावणार आहेत का ? हाच खरा प्रश्‍न मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाची सुरवात केली यात शंकाच उरली नाही, मात्र त्यावरून लोकमान्यांचे गणेशोत्सवातले योगदान नाकारणे अत्यंत चुकीचे  असल्याचे बोलले जात आहे. परंतु रंगारी यांनी उत्सव सुरु केल्याने आता टिळकांचा प्रश्‍नच राहतच नाही मात्र, काहींना रंगारींना स्विकारायचे नसल्याने त्यांनी टिळकाच्या नावाने टाहो फोडण्याचा उदयोग सुुरु केला आहे. भाऊ रंगारी यांनी या उत्सवाची सुरवात केली यात शंकाच नाही. त्याबद्दल त्यांना श्रेय दिलेच पाहिजे पण असे ही  एक प्रवाह  पुढे आला आहे. श्रेय देताना भाऊसाहेब रंगारी  यांनी या उत्सवाचा देशात राष्ट्रीयत्वाची ज्योत पेटवण्यासाठी उपयोग केला. हिंदू - मुस्लीम यांना एकत्र आणून पहिली बैठक घेवून जातीयवादाला आणि धर्मवादाला बाजूला सारून त्यांनी एकोपा राखण्यासाठी गणेशोत्सवाची सुरवात केली.  भाऊसाहेब  रंगारी  यांचे  हे योगदान आता नाकारुन चालणार नाही. टिळक आणि  रंगारी  एकमेकांचे  उत्तम सहकारी होते हे  ही  आता टाळून चालणार नाही. रंगारी यांच्या कार्याला टिळकांनी प्रसिध्दी  केसरीमधून देवून रंगारी यांचे काम पुढे आणण्याचे काम त्यांनीही काही प्रमाणात केले. आज आपण स्वातंत्र्यपूर्व गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यातून एकोपा राखण्यासाठी सर्वांनी आपले काम केले पाहिजे यात शंका नाही.  परंतु विनाकारण राजकारण करुन सामाजिक आणि धामिक वृत्तीमध्ये तेड निर्माण करण्याचे काम कोणत्याही राजकारण्यांनी करु नये एवढीच अपेक्षा आहे.
चौकट ः एकोपा राखण्याचे काम मंडळांकडून व्हावे
आज गणपती उत्सवाला वेगळे स्वरुप निर्माण होत चालले आहे. याला आळा घालण्याचे कामही आपलेच आहे. या गणेशोत्सवामध्ये यंदापासून एकोपा राखण्यासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. गणपती मंडळांनी यंदाच्यावर्षी कोणत्याही मोठ्या खर्चापेक्षा सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे. गणपती उत्सवात डिजे वाजवण्यापेक्षा समाजातील प्रबोधनासाठी महामानवांच्या विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे असाच उत्सव आता अपेक्षित आहे.
हिंदू - मुस्लिम ऐक्याचा उत्सव व्हावा
इ.स.1893 साली पुण्यात हिंदू - मुस्लिम या दोन लोकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावर तोडगा काढण्याकरिता पुण्यातील पुढारी भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी एक सभा भरविण्यात आली. या सभेत सरदारांपुरता सीमित गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाऊसाहेब रंगारी, गणपतराव पोटवडेकर, कृ.का.खाजगीवाले यांनी 1894 च्या अनंतचतुर्दशीला गणपतीमूर्तीच्या मिरवणुकीची तसेच विसर्जनाची प्रथा सुरु केली. या मिरवणुकीमागे मोहरमच्यावेळी मुस्लीम लोक काढतात, तसे ताजिये ही प्रेरणा होती. अर्थात, मुस्लिमांच्या अनुकरणातून महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला.
गणेशोत्सव सुध्दा राजकारणात अडकला
गणेशोत्सवाचे  कर्ते कोण ? यावरून विनाकारण वाद पेटवला जात आहे. या वादाच्या आगीत अनेक जण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत हे चुकीचे आहे. काहीजण या वादाच्या निमित्ताने राजकारण करत आहेत. त्याबद्दल गणेशच त्यांना सुबुद्धी देवो असे म्हणावेसे वाटते. मात्र या मुद्यावरून पुण्यात सध्या जी टिळकभक्तीची लाट आली आहे त्यामागे टिळकप्रेम किती आणि त्यावरून कुणाला आपापला अजेंडा कसा रेटायचा आहे या प्रश्‍नांच्या उत्तरातच या वादाची मुळे दडली आहेत.