Breaking News

डीजेवाल्यांचा आवाज थांबणार

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा वाद्य वाजवणार्‍यांना चांगले दिवस येणार 

अहमदनगर, दि. 24 - गणपती उत्सव आणि दहिहंडी उत्सव म्हंटल की, डिजेचा आवाज वाजणारच अशी काहीशी कल्पना यंदा पाहण्यास मिळाली नाही. युवापिढी जी डीजेच्या आवाजात थिरकताना दिसत असे ती आता थंडावली असून डिजे चालकांनीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गोष्टी पाहिल्या तर त्यातील दहीहंडीचे स्तर पाहिजे तेवढे लावा  असे म्हणत न्यायालयाने त्याची (स्तर ठरविण्याची) जबाबदारी राज्यसरकारवर टाकली आहे. तरीही यातून अनेक गोविंदा यंदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. यातून आता पुन्हा न्यायालयात कोणी जाणार नाही आणि न्यायालयाचे काही बंधन नको यासाठी अनेकांनी यंदाच्यावर्षी डिजेचा आवाज कमी करुन ढोल, ताशांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. 
दहीहंडी उत्सवाचे तसेच गणपती उत्सवाचे  आयोजक खुशीत असताना डीजे वाल्याना  मात्र आवाजाच्या मर्यादेवरून दहीहंडी आणि गणेश उत्सवात असहकार पुकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र आहे म्हणे. आता हे म्हणजे, एका हाताने पुढे जा म्हणायचे आणि दुसर्‍या हाताने धरून ठेवायचे अशीच काहीशी भूमिका मांडण्याचा प्रकार आहे. डिजेचा आवाज आला नाही तर युवकांच्या अंगात येत नाही असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. डिजेच नसेल तर उत्सवाला मजा हाय का ?  असा प्रश्‍न विचारला जात आहे. एक तर आपल्याकडे सणाला नाही तोटा. शिवाय असे सण वर्षातून फक्त एकदाच येत असतात आणि तेही साजरे करायचे काय उपयोग असाही एक प्रवाह निर्माण होत चालला आहे? त्यामुळे कोणताही सण साजरा करायचा म्हणजे डीजे चा दणदणाट पाहिजे का नको हे पडताळण्याची वेळ आली आहे. याचाच एक भाग म्हणून की काय डीजे चालकांनी आपला निर्णय घेवून यंदा आवाज वाढवायचा नाही किंवा त्याशिवाय सण साजरा केल्याचे समाधान तरी कसे मिळणार !.आणि मह्त्वाचे म्हणजे एकदा का या डीजे च्या आवाजाची झिंग चढली की नाचण्याशिवाय पर्यायच उरत नाही त्यामुळे अनायासे गल्लोगल्ली शामक डावर तयार होऊ लागले होते. .
या डीजेच्या आवाजामुळे म्हणे कोणाची तरी डोकेदुखी सुरु झाली आणि त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि मग न्यायालयाने देखील त्यांची डोकेदुखी दूर करण्यासाठी डीजेच्या आवाजावर तसेच कालमर्यादेवर बंदी घातली. त्यामुळे या डीजे चा आवाज डेसिबल मध्ये मोजण्यात येऊ लागला शिवाय रात्री दहा वाजेपर्यंतच डेसिबलचा आवाज विशिष्ट पातळीपर्यंतच ठेवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र हा आदेश ऐकतोय कोण? डीजे चा आवाज कमी झाला की, नाचणार्‍यांचे पाय जागीच थबकायला लागले त्यासाठी अरे आवाज वाढीव की असे डीजे वाजविणार्‍यांना सांगण्यात येऊ लागले. एकाने तर पोष्टर गर्लच्या मदतीने अरे आवाज वाढीव, डीजे तुझ्या आईची  असे म्हणत आईची शपथ  घालणारे खास गाणेही तयार केले असल्याचे पहायास मिळाले आहे. आता हे गाणे डीजेचा आवाज वाढविल्याशिवाय स्पष्ट कसे ऐकू येणार? शिवाय एका डीजेमधून हे गाणे म्हणजे महापापच की, त्यामुळे डीजेच्या भिंतीच्या भिंती उभ्या राहू लागल्या. रस्ता अरूंद असो व गल्लीबोळ कितीही छोटा असला तरी तेथे या डीजेच्या भिंती उभारण्यात येऊ लागल्या. त्यामुळे आवाजाच्या दणदणाट घुमू लागला. शिवाय वाहतुकीची कोंडी होऊ लागली तर अनेक ठिकाणी रुग्णसेवेचीही कुंचबना होवू लागली. गाण्यांवर थिरकणारी युवापीढी काहीही न करता रुग्णवाहिकेलाही जलागा देताना दिसत नव्हती. यावरुन पिढी अधोगतीकडे नेत आहे की प्रगतीकडे हा ही प्रश्‍न जेष्ठ नागरिकांना पडावा. मात्र कोण करणार यांच्याशी कटकट यातून कोणीही या नाचणार्‍यांना काहीच म्हणत नसे. सायलेन्स झोन आणि इतर गोष्टीचाही कोणी विचार करत नसल्याने अनेकांचा डीजेला विरोध होता.
सामाजिक ऐक्याचा उत्सव व्हावा
अनेकदा धार्मिकतेचा रंग उत्सवांना चढविला जातो मात्र हा सण म्हणजे सर्वांनी मिळून साजरा करण्याचा उत्सव असतो. याला आता कोणीही नाही असे म्हणू शकत नाही. मात्र काही प्रवृत्ती दोन समाजात वाद लावण्यासाठी याचा वापर करताना पहावयास मिळत होत्या. मात्र यंदा डीजेचा आवाज येणार नसल्याने अशा प्रवृत्तीना थोड्याप्रमाणात का होईना आळा बसण्यास सुरवात होईल. गणेशोत्सव हा सर्वधर्माना एकत्र करण्यासाठी असल्याने यामध्ये विचारांची आणि महामानवांची देवाण घेवाण होवून सामाजिक उपक्रमांची कामे केली पाहिजे असा सूर आता जेष्ठ नागरिकांमधून  व्यक्त केला जात आहे.