Breaking News

पुरूष दुहेरीत फ्रान्सचे माहुत-हर्बर्ट विजेते; महिला दुहेरीत हिंगीस-चॅन सरस

सिनसिनाटी, दि. 21, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत फ्रान्सच्या निकोलस माहुत आणि पेरी हर्बर्ट जोडीने विजेतेपद  पटकावले, तर महिला दुहेरीत स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस आणि तैवानची चॅन युंग-जान या जोडीने अजिंक्यपद पटकावले.
पुरूष दुहेरीत पाचव्या मानांकित फ्रान्सच्या जोडीने इंग्लंडचा मरे आणि ब्राझीलचा सोरेझ या तृतीय मानांकित जोडीला 7-6 (8-6), 6-4 असे पराभूत  केले. पहिला सेट अटीतटीचा झाला. दोन्ही जोड्यांनी शेवटपर्यंत हार मानली नाही. अखेर टायब्रेकरमध्ये फ्रान्सच्या जोडीने 8-6 असा हा सेट जिंकला.  दुस-या सेटमध्ये चाहत्यांना अपेक्षित झुंज पाहायला मिळाली नाही. फ्रान्सच्या जोडीने विजेतेपदावर नाव कोरले.
महिला दुहेरीत द्वितीय मानांकित हिंगीस-चॅन जोडीने बिगरमानांकित तैवानची साय सु-वै आणि रोमानियाची मोनिका निक्युलेस्कू या जोडीवर 4-6, 6-4,  10-7 असा विजय मिळवला. पहिला सेट सु-वै- निक्युलेस्कू जोडीने जिंकला होता. पण हिंगीस-चॅन जोडीने दमदार पुनरागमन करत दुसरा सेट आपल्या  नावे केला. तिसरा सेटही चुरशीचा झाला, पण द्वितीय मानांकित जोडीच्या अनुभवापुढे बिगरमानांकित जोडीचा निभाव लागला नाही.