Breaking News

दिमित्रोव्हने जिंकले ‘सिनसिनाटी ओपन’चे अजिंक्यपद

सिनसिनाटी, दि. 21, ऑगस्ट - सातव्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हने सिनसिनाटी खुल्या टेनिसचे विजेतेपद पटकावले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या  निकोलस कार्गिओसला 6-3, 7-5 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित स्टार टेनिसपटू राफेल नडालला नमवल्यामुळे  कार्गिओस स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण दिमित्रोव्हने लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने दोन्ही सेट लीलया जिंकले आणि  बिगरमानांकित कार्गिओसला धूळ चारून स्पर्धेतील मानांकनाला न्याय दिला. विम्बल्डन स्पर्धेत विजेत्या रॉजर फेडररकडून दिमित्रोव्हला उप-उपांत्यपूर्व  फेरीत पराभूत स्वीकारावा लागला होता. त्यानंतर झालेल्या वॉशिंग्टन ओपन आणि कॅनडा ओपन या दोन्ही स्पर्धांमध्येही त्याला उप-उपांत्यपूर्व फेरीतच  गाशा गुंडाळावा लागला होता.