सिनसिनाटी ओपन : महिला गटात गार्बिन मुगुरूझा अजिंक्य !
सिनसिनाटी, दि. 21, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रोमानियाच्या द्वितीय मानांकित सिमोन हॅलेपवर स्पेनची चतुर्थ मानांकित गार्बिन मुगुरूझाने 6-1, 6-0 अशा दोन सरळ सेटमध्ये मात केली . मुगरूझाच्या झंझावातपुढे हॅलेपने सपशेल शरणागती पत्करली. पहिल्या गेमपासूनच मुगरूझाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. हॅलेपला पहिल्या सेटमध्ये केवळ 1 गेम जिंकता आला, तर दुस-यामध्ये तिला साधे खातेही उघडता आले नाही. हॅलेपला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेण्याची चांगली संधी होती. पण आता ती शक्यता धूसर झाली आहे.
