Breaking News

आयडॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी 62 स्पर्धकांची निवड

बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे आयोजन

बुलडाणा, दि. 24 - स्थानिक बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त बुलडाणा आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या  स्पर्धेची उपउपांत्य फेरी नुकतीच मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेरीत 62 स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात  आली असून, 3 सप्टेंबर रोजी होणार्‍या सेमीफायनलसाठी सदर स्पर्धेत पात्र ठरले आहेत.
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदा 16 वे वर्ष असून गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  येते. शहरी व ग्रामीण भागातील नवोदित प्रतिभावंत गायक गायिकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपिठ मिळावे त्याचबरोबर त्यांच्या सुप्तकलागुणांना वाव  मिळावा म्हणून मंडळाच्या वतीने अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गत नऊ वर्षांपासून बुलडाणा आयडॉल स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यावर्षी बुलडाणा,  अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, जळगाव (खान्देश) व औरंगाबाद जिल्ह्यात इच्छुक गायक स्पर्धकांची ऑडीशन घेतली. यावेळी उपरोक्त सात जिल्ह्यात  झालेल्या ऑडीशनमधून 187 स्पर्धकांची उपउपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली. दरम्यान शनिवारी स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात उपाउपांत्य फेरीचे  शानदार उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी स्पर्धेचे परीक्षक गजानन आजनकर, पुर्णाजी खानोदे, सिंफनी ग्रुपचे सचिन गुढे, प्रशांत ठाकरे, विशाल पांडे, मास्टर कुलदिप आदी उपस्थित होते. यावेळी  डॉ. झंवर व उपस्थित मान्यवरांनी उद्घाटन केले. यावेळी माडळाचे सचिव संजय कुळकर्णी यांनी आयडॉल स्पर्धेचा हेतू, उद्देश व या स्पर्धेची आजपयर्ंतची यशस्वी  वाटचाल या संदर्भात माहिती विषद केली. यावेळी मनोगत व्यक्त करतांना डॉ.सुकेश झंवर यांनी बुलडाणा आयडॉल स्पर्धा म्हणजे उत्कष्ठ आयोजनाला सशक्त  नियोजनाची जोड देऊन अत्यंत लोकप्रिय झालेला कार्यक्रम असल्याचे सांगितले.
दरम्यान, उपउपांत्य फेरीतून उपांत्य फेरीसाठी 62 स्पर्धकांची निवड करण्यात आली असून स्पर्धेची उपांत्यफेरी 3 सप्टेंबर रोजी आणि स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 4  सप्टेंबर रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेला जिल्ह्यातील कलारसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष  गजानन चवरे व सचिव संजय कुळकर्णी तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.