Breaking News

रेल्वेतील वातानुकूलित सेवा बंद असल्यास आता नुकसान भारपाई मिळणार

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - रेल्वेतील वातानुकूलित सेवा बंद असल्यास प्रवाशांना नुकसान भारपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण  आयोगाकडून रेल्वे प्रशासनास देण्यात आले आहेत. वातानुकूलित श्रेणीतील तिकिट काढून प्रवास करणा-या प्रवाशाला उन्हळ्याच्या दिवसांमध्ये 30 तास  बिना वातानुकूलित सेवेचा प्रवास करावा लागल्याने त्याने तक्रार दाखल केली होती. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रेल्वेप्रशासनाला नुकसान भरपाई  देण्याचे आदेश दिले होते. त्यावर या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राज्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे रेल्वे प्रशासनाकडून दाखल  करण्यात आली. तेथेही रेल्वे प्रशासनाच्या बाजूने निकाल न लागल्याने त्यांनी अखेर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली. मात्र, राष्ट्रीय  ग्राहक तक्रार निवारण आयोगानेही रेल्वे प्रशानसाची याचिका फेटाळत नुकसान भरपाईचा निर्णय कायम ठेवला.
याचिका मुळात बराच कालावधी उलटून गेल्यानंतर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी वेळ घालवणे म्हणजे तक्रारकर्त्या प्रवाशाच्या  त्रासात भर टाकण्यासारखे ठरेल, असे आयोगाने सुनावणीदरम्यान सांगितले. याचिका दाखल करण्यात, खटले चालवण्यात वेळ व पैसा खर्ची करण्यापेक्षा  ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा द्या, अशा शब्दात न्यायमूर्ती डी.के. जैन व एम. श्रीशा यांच्या पीठाने रेल्वे प्रशासनास फटकारले.