Breaking News

गुजरात राज्यसभा निवडणुकीत नोटा नको, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - गुजरात राज्यातून होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय वापरायला काँग्रेसनं हरकत घेतली आहे. त्याचाच भाग  म्हणून सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसनं धाव घेत यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. येत्या 8 ऑगस्टला गुजरातमधून  राज्यसभेच्या 3 जागांकरता निवडणूक होत आहे. या निवडणुकीत नोटाचा पर्याय वापरला जाऊ नये याकरता, काँग्रेसनं संसदेतही जोरदार आघाडी उभारली होती.
गुजरातमधली राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. गुजरातमधून काँग्रेसचे नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल राज्यसभेच्या रिंगणात  आहेत. अहमद पटेल यांना हरवून काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का देऊन नामोहरम करण्याच्या प्रयत्नामध्ये भाजप आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार फुटू  नयेत म्हणून काँग्रेसनं त्यांच्या 42 आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी  विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे  गुजरातमधून काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढवणारे अहमद पटेल आणि काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झाली.