Breaking News

सव्वाशे घरात कागदी लगदयाच्या गणेशमूर्तिंची प्रतिष्ठापना

लिटल अँजल व साई इंग्लिश स्कुल मधे डॉ.बागूल यांची माय गणेशाकार्यशाळा संपन्न

अहमदनगर, दि. 29, ऑगस्ट - एम. आय.डी.सी. मधील लिटल अँजल स्कुल व साई इंग्लिश स्कुल येथे नुकतीच  डॉ.अमोल बागूल यांची माय गणेशा ही कागदी  लगदा,भुस्सा व मातीच्या  मिश्रणापासून पर्यावरणपुरक गणेशमूर्ती बनवा कार्यशाळा संपन्न झाली.त्यात दोन्ही शाळेतील सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व  पर्यावरणपुरक गणेशमूर्तिंची प्रतिष्ठापना केली. आणि विशेष म्हणजे शाळेतच या मूर्तिंचे अमोनियम बायकार्बोनेट मधे विसर्जन केले जाणार आहे.
शाडू माती,लाकडाचा भुस्सा,कागदी लगदा यांच्या मिश्रणापासून तयार झालेल्या माध्यमातून मूलांना या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण  कलाकार डॉ.अमोल बागूल यांनी  दिले.रद्दी वर्तमानपत्रे,कागद पाण्यात भिजवून त्याच्या लगद्यात डिंक,माती,वाळू मिसळून तयार झालेल्या लगद्याला पाहिजे तसा आकार देता येतो तसेच या मूर्ती  वजनाला अत्यंत हलक्या बनतात.हळद,कुंकु,मातीचे रंग देवून कागदी फुलांची सजावट देखील मुलांनी केली.
मूर्ती विसर्जनाच्या पाण्यात 20 टक्के अमोनियम बायकार्बोनेट मिसळल्यास
पीओपी  निर्मित मूर्तिंचे 20 तासात तर शाडू,कागद लगदयाच्या मुर्तीचे 4 तासात विघटन होते.विघटनानंतर त्यातून निघणार्‍या अमोनियम सल्फेट चा वापर ख़त  म्हणून करता येतो तर  त्यातून तयार होणार्‍या केल्शियम कार्बोनेटचा वापर बांधकामाच्या मजबूतीसाठी शक्य आहे असे डॉ.बागूल यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत संचालक आदर्श ढोरजकर यांनी केले तर प्रास्ताविक आकांक्षा ढ़ोरजकर यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष सीताराम ढोरजकर यांनी मुलांना पर्यावरण  रक्षणाची शपथ दिली . शिक्षिका सुमिता नाडर,रोहिणी जाधव,स्वाती कल्हापुरे,पूजा पटारे, सुजाता गुंजाळ, स्वाती भापकर आदी शिक्षिकांनी माय गणेशा कार्यशा  ळेसाठी परिश्रम घेतले. शिक्षक, पालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.