Breaking News

निंबोडीत शाळेचे छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

बाळकुणाल अहिरे/अहमदनगर, दि. 29, ऑगस्ट - अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथामिक शाळेचे छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 16 विद्यार्थी जखमी झालेत. या घटनेमध्ये श्रेयस राहणे, वैशाली पोटे यांचा मृत्यू झाला असून, अन्य एकाचे नाव समजु शकले नाही. शाळा सुटायला अवघ्या दहा मिनिटांचा अवधी असतांना ही घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडेचार- पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर  शहरातील सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, तहसीलदार सुधिर पाटील, उपाध्यक्ष राजश्री  घुले, यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला दिशा दिली.  घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी असुन याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अध्यक्षा  विखे यांनी दिली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून निंबोडी येथे जोरदार पाऊस सुरू होता, त्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात असले, तरी मागील अनेक महिन्यापासून शाळेचे वर्ग  जीर्ण झाले होते. यासंबधी शाळेच्या वतीने प्रशासनाकडून शाळेची स्थितीसंदर्भात निवेदन देत, तर कधी जि.प.च्या बैठकांमध्ये यासंदर्भाचा विषय उपस्थित होऊन, तर  शाळा खोल्या दुरुस्तीच्यासाठी निधी मिळावा म्हणून राज्य शासनाकडे तसेच साईबाबा संस्थानकडे निधी मिळण्यासाठी लेखी पत्राव्दारे संपर्क करण्यात आला  असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र या शाळेच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शाळेचे छत कोसळून हकनाक - तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर  अनेक विद्यार्थी जखमी झालेत. पावसामुळे आपत्ती व्यवस्थापनाला मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र पावसाची परवा न करता अनेकांनी मदतकार्य करुन या सर्व  मुलांना बाहेर काढले.