Breaking News

संगमेश्‍वर तालुक्यातील साडेतीनशे वर्षांचे दोन गणेशोत्सव सुरू

रत्नागिरी, दि. 25, ऑगस्ट - संगमेश्‍वर तालुक्यातील तीनशे वर्षांहून अधिक परंपरा असलेले दोन गणेशोत्सव सुरू झाले आहेत. एक गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध  प्रतिपदेपासून सुरू होतो, तर दुसरा मंदिरातील उत्सव उद्यापासून (गणेश चतुर्थी) सुरू होईल. मोरगावच्या मयूरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा आणि कोकणातील  गणेशोत्सवाची सुरवात म्हणून प्रसिद्ध असलेला तसेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालणारा देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला  मंगळवारपासून (दि. 22 ऑगस्ट) सुरू झाला आहे. गेली 358 वर्षे हा उत्सव सुरू आहे. इ. स. 1700 साली सांगली जिल्ह्यात असणा-या कांदे मांगले या गावाहून  देवरुखात आलेल्या भास्कर जोशी बिनबाळ जोशी यांचे थोरले चिरंजीव बाबा जोशी बिनभास्कर जोशी हेच देवरूखमधील श्री सिद्धिविनायक या देवस्थानाचे  आद्यसंस्थापक होत. बाबा जोशी हे गृहस्थाश्रमी म्हणून देवरूख येथे राहत असताना त्यांना दुर्धर व्याधीने ग्रासले. त्यावर त्यांनी देवधामापुरातील शंकराच्या जागृत  देवस्थानात व नंतर मोरगावातील मयूरेश्‍वराजवळ कडक उपासना सुरू केली. तेथे त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार चांदीच्या डब्यात श्री सिद्धिविनायकाची नुकतीच पूजा  केलेली मूर्ती सापडली. ती मूर्ती त्यांनी देवरूखला आणली आणि चौसोपी वाड्यात त्याची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध  प्रतिपदेला सुरू होतो व शुद्ध पंचमीला षष्ठी उजाडताना संपतो. गेली साडेतीनशे वर्षे या उत्सवाची ही परंपरा कायम आहे. सर्वच ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची भाद्रपद  शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठापना होते, मात्र जोशी बुवांकडील गणेशोत्सवाला शुद्ध प्रतिपदेला सुरवात होते. गणपतीपुळे येथेही भाद्रपदी उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू  झाला आहे. जोशी घराण्याची सातवी पिढी रघुनाथ काशिनाथ तथा पंताभाऊ जोशी यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई  जोशी आणि त्यांचे नातेवाईक, परिसरातील हितचिंतक व भाविकांच्या साथीने हा उत्सव तेवढ्याच उत्साहात साजरा केला जात आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन  येथे सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेले गणेशमंदिर असून पेशवेकाळापासून सुरू असलेला या मंदिराचा गणेशोत्सव हा तेथील मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. या  मंदिरात पंचधातूची गणेशमूर्ती आहे. पेशवे काळात माखजन येथील जोशी घराण्याचे पूर्वज ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सांगितलेली कित्येक भाकिते त्यावेळी  खरी ठरली होती. त्यांच्या या विद्वत्तेवर खूष होऊन पेशव्यांनी त्यांना काय पाहिजे ते मागा, असे सांगितले होते. त्यावेळी श्री गणेशाचे भक्त असलेल्या जोशींनी सोने  नाणे न मागता श्री गणेशाची मूर्ती मागितली होती. पेशव्यांनी पंचधातूने बनविलेली मूर्ती जोशींना भेट म्हणून दिली. या मूर्तीची प्रतिष्ठापना माखजन गावात केली. ही  गणेशमूर्ती योद्ध्याच्या रूपातील असून बाजूलाच ऋद्धी सिद्धी विराजमान झाल्या आहेत. माखजन गावात या गणेशाचे छोटेखानी मंदिर असून दरवर्षी गणेशचतुर्थीला  येथे उत्सव साजरा होतो. मूर्तीवरील धातूंचे कोरीव काम आकर्षक आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील आरवलीपासून 4 किमी अंतरावर हे देवस्थान आहे. जोशी  घराण्याची आठवी पिढी या मूर्तीची सेवा करीत आहे.