Breaking News

... येथे सुरू झाली राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धा !

लातूर, दि. 29, ऑगस्ट - गणपती म्हटलं की ढोलताशा आलाच! ही सुरुवात नाशिक ढोलपासून झाली. त्यात दिवसेंदिवस विकासच होत गेला, कला बहरत गेली.  राज्यभरातील जवळपास सगळ्याच मोठ्या संघांकडे ढोलताशा पथके आहेत. महिनोनमहिने त्यांचा सराव सुरु असतो. विसर्जनाच्या दिवशी त्यांची कला पहायला  मिळते. महाराष्ट्राच्या गणेशोत्सव संस्कृतीचा भाग बनत चाललेल्या या कलेला दीपस्तंभ परिवाराने हेरले आणि त्यांची राज्यस्तरीय स्पर्धाच ठेऊन टाकली. लातुरच्या  क्रीडा संकुलावर ही स्पर्धा सुरु झालीय. तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. 
स्पर्धा नेटकी असावी, फापटपसारा टाळला जावा यासाठी दीपस्तंभने राज्यभरातून प्रवेशिका मागवल्या. प्रवेशिकेसोबत त्या त्या पथकांच्या ढोलताशा सादरकरणाच्या  चित्रफितीही मागवल्या. अशा 26 चित्रफिती आल्या. त्यातील निवडक दहाजणांना स्पर्धेचं निमंत्रण धाडले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उदघाटन केल्यानंतर या  दहा पथकांच्या कला प्रदर्शनाला सुरुवात झाली. एकेक संघ कमालीचे वादन करतो, त्यांचे पदन्यास आणि ढोलताशा सोबतचे पदलालित्य डोळ्यात साठवून ठेवावे  असे आहे. ही स्पर्धा तरुणाईची कला आणि ताकद दाखविण्यासाठी तसेच उत्साह वाढवण्यासाठी आयोजित केल्याचे संयोजक योगेश कर्वा यांनी सांगितले. राज्याचे  धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगेही उपस्थित होते. योगेश कर्वा मुख्य संयोजक आहेत. त्यांना रितेश लोया, रवींद्र दरक, स्वप्नील पिलाजी, ओमप्रकाश झुरळे, डॉ.  अभय पुनपाळे, लक्ष्मीकांत कर्वा, चंद्रकांत पाचेगावकर, सोनू डगवाले, रवी सौदागर, अमोल बनाळे, विशाल अग्रवाल, रवी बरमदे, सचिन लोया, दिग्विजय काथवटे  यांची समर्थ साथ मिळाली.