Breaking News

खट्टर यांना हटवणार नाही ; भाजप नेतृत्वाकडून संकेत

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - हरयाणाचे मुख्यमंत्री मनहरलाल खट्टर यांना हटविण्याचा कोणताही विचार नसल्याचे संकेत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने  दिले आहेत. हरयाणात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल पंजाब - हरयाणा उच्च न्यायालयाने हरयाणाचे मुख्यमंत्री मनहरलाल खट्टर यांना अत्यंत कडक शब्दांत  फटकारल्यानंतर खट्टर यांना हटवले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती .हरयाणातील स्थितीबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्षाच्या  पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती . पक्षाचे हरयाणाचे प्रभारी अनिल जैन , कैलाश विजयवर्गीय आदी उपस्थित होते . या बैठकीत हरयाणातील स्थितीचा आढावा  घेण्यात आला . मात्र या बैठकीत खट्टर यांचा राजीनामा घेण्यावर कोणतीही चर्चा झाली नाही , असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले . खट्टर यांच्याकडून  हरयाणातील स्थितीबाबत कोणतेही स्पष्टीकरण मागितले जाणार नाही , असेही पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.