Breaking News

कारखान्याच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गतीःआ. पाटील

कराड, दि. 21 प्रतिनिधी -राज्य सरकार एका बाजूला  ऊस लावण्यासाठी ठिंबक सिंचन बंधनकारक करीत आहे,तर दुस-या बाजूला आमच्या कारकिर्दीत शेतक-यांना ठिंबक सिंचनसाठी देत असलेले अनुदान कमी करीत असल्याचा आरोप  माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी बावची येथील उद्घाटन कार्यक्रमात केला. बावची गावासह वाळवा तालुक्याने विकासाची एक परंपरा निर्माण केली असून यामध्ये जर कोणी बाधा आणत असेल,तर त्यांना ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून धडा शिकवा,असे आवाहनही त्यांनी केले.  
आ.पाटील यांच्या हस्ते आर.सी.सी बंधारा,अंगणवाडी व शाळा खोल्या, बाजारकटटे, मुस्लिम समाज दफनभ्ाूमीची सरंक्षक भिंत,धयसिध्द देवालयासमोर फेव्हिंग ब्लॉक आदी विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू साखर कारखान्याचे चेेअरमन पी.आर.पाटील,बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील,राष्टवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,पं.स.सभापती सचिन हुलवान,उपसभापती नेताजीबाबा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राजारामबापू सह.साखर कारखान्याच्या राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या वतीने बावचीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेस लोकवर्गणीच्या 5 टक्के म्हणजे 9 लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी भोलाफेकपटू वैभव यादव यांचा सत्कार करण्यात आला.
आ.पाटील पुढे म्हणाले,बावचीच्या शिवारात कारखान्याच्या माध्यमातून पाणी फिरले आणि गावाच्या विकासाला गती मिळाली. या गावातील पाणी योजनेची आठवण म्हणून आपण चौकात कारंजा उभा केला आहे. बावची हे एक भरोशाचे गांव आहे. ग्रामंपचायत निवडणूका ताकदीने लढवा. जर कोणी आपला पराभव करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवित असेल,तर गट-तट,भावकी बाजूला ठेवून त्यांना जागा दाखवून दया. गेलेली सत्ता कशी आणायची याची अक्कल आमच्याकडे आहे. मात्र सत्ता नसतानाच ख-या निष्ठावंतांची ओळख होत आहे. यावेळी त्यांनी कर्जमाफी,विजेचे वाढलेले दर आदी राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून टिका केली.
सभापती आनंदराव पाटील म्हणाले,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही विविध गावात 4 कोटीची साठवणूकगृहे व बाजारकटटे बांधले आहेत. आष्टा येथे नव्याने सुरू केलेल्या हळद बाजारपेठेस शेतकरी व व्यापा-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजयबापू पाटील यांनी या गावाने सातत्याने साहेबांना ताकद दिली असून पुढेही त्यांचे हात बळकट करा,असे आवाहन केले. पं.स.सभापती सचिन हुलवान यांचेही भाषण झाले.
तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभ्ाूमीवर विरोधकांना चांगलेच फटकारले. राजारामबापू सह.बॅकेचे संचालक विजयबापू यादव,बावची सह.पाणीपूरवठा संस्थेचे चेअरमन वैभव रकटे,माजी पं.स.सदस्य लालासाो अनुसे,मोहनराव माने यांनी आ.जयंतराव पाटील यांनी गावात केलेल्या विकासांचा पाढा वाचून भविष्यातही बावचीचा सरपंच हा साहेबांचाच असेल,असा विश्‍वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,साखर कारखान्याचे संचालक ए.टी.पाटील,विराज शिंदे,जि.प.सदस्या सौ.राजश्री एटम,महिला जिल्हाध्यक्षा सौ.छाया पाटील,माजी युवक तालुकाध्यक्ष संजय पाटील,नंदकुमार पाटील,सरपंच सौ.वंदना शिंदे,उपसरपंच संभाजी पाटील, सोसायटी चेअरमन संजय पाटील, अनिल शिंगारे, उल्हास माने,किरण माळी,अधिक खाडे,सौ.मनिषा पाटील,संजय जाधव,संभाजी मस्के यांच्या सह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सतिश पाटील यांनी आभार मानले.