Breaking News

चाकूचा धाक दाखवून पाच लाखांची लुट

कराड, दि. 21 प्रतिनिधी - नाशिकहून तामिळनाडू राज्यातील उसुर येथे जीप घेऊन निघालेल्या चालकाला चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड व पाच लाखाची जीप दोघांनी लंपास केली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत जेवेंद्रलाल मेघराज लुनावत (वय 52, रा. द्वारका सर्कल, जुने नाशिक) या चालकाने कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील जेवेंद्रलाल लुनावत हे स्फेटी मोटर ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून काम करतात. नाशिकमधून ट्रान्सपोर्टच्या जीप घेऊन त्या तामिळनाडू राज्यातील उसुर येथे पोहोचविण्याची जबाबदारी लुनावत यांच्याकडे असते. शुक्रवारी सकाळी ते नाशिकमधून एक नविन जीप घेऊन तामिळनाडूला जाण्यासाठी निघाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे, खेड शिवापूर, खंडाळा, सातारा या मार्गे ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर पोहोचले. त्याठिकाणी जीप थांबवून लुनावत यांनी चहा घेतला. त्यानंतर काहीवेळ विश्रांती घेऊन ते पुन्हा कोल्हापुरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना दोन युवक त्यांच्याजवळ आले. त्यांनी पेठनाका येथे जायचे असल्याचे लुनावत यांना सांगीतले. युवकांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेऊन लुनावत यांनी दोघांनाही जीपमध्ये घेतले. त्यानंतर ते कजहाड, मलकापूर, नांदलापूर मार्गे महामार्गावरून वाठार गावच्या हद्दीत पोहोचले. त्यावेळी एका युवकाने खिशातील चाकू काढून लुनावत यांच्या गळ्याला लावला. ठार मारण्याची धमकी देत त्याने जीप उभी करण्यास सांगीतले. त्यामुळे  लुनावत यांनी जीप रस्त्याकडेला उभी केली. त्यानंतर दुसजया युवकाने जीपचा ताबा घेऊन ती पुन्हा मागे कजहाडच्या दिशेने वळवली. आटके टप्पा येथून ते जीप घेऊन रेठरे बुद्रूकच्या दिशेने गेले. तेथून ते कराड-तासगाव मार्गावरून टेंभूच्या दिशेने गेले. काही अंतर गेल्यानंतर संबंधित युवकाने निर्जनस्थळी जीप थांबवून लुनावत यांच्याकडील रोकड व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते युवक जीप घेऊन पसार झाले.
जेवेंद्रलाल लुनावत यांनी याबाबत शनिवारी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.