Breaking News

कर्मचारी मारहाणप्रकरणी महाविद्यालयात गेटबंद आंदोलन विविध संघटनांचा निवेदनाद्वारे इशारा

अहमदनगर, दि. 27, ऑगस्ट - येथील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांनी कर्मचा-यास केलेल्या मारहाणप्रकरणी त्यांच्याविरुद्ध येत्या दोन दिवसांत अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये दखलपात्र गुन्हा दाखल करावा. अन्यथा महाविद्यालयात गेटबंद आंदोलन करू, अशा इशारा शहरातील विविध संघटनांनी  दिला. यासंदर्भात शेवगाव पोलिस ठाण्यावर नेऊन निवेदन देण्यात आले.
या मोर्चात संभाजी ब्रिगेड, दलित संघटना, वीर भगतसिंग विदयार्थी परिषद, ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन, चर्मकार विकास संघ आदी विविध संघटनांनी भाग घेतला. रिजवान शेख, समीर शेख, निलेश बोरुडे, लक्ष्मन गायके, संजय नांगरे, गोरख वाघमारे, संजय गुजर, प्रकाश तुजारे, अशोक शेवाळे, राजु गुजर, नितेश गटकळ  आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.  यात म्हटले आहे, की शहरातील न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मतकर यांनी प्रयोगशाळा परिचर कर्मचारी संतोष गुजर या शाळेच्या वेळेत विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या समोर जातीयवाचक शिविगाळ करुण मारहाण केल्याचा प्रकार दि.24 रोजी घडला. पोलीसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. प्राचचार्य मतकर यांनी जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केल्याने त्यांच्यावर अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कलमान्वये दखलपात्र गुन्हा दाखल करून अटक करावी. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. मतकर यांच्याकडून दलित समाजावर सतत अन्याय करीत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी यांनाही चागंली वागणूक देत नाहीत, असे असताना त्यांना संस्था पाठीशी घालते, असा आरोप कॉ. संजय नांगरे यांनी केला. या प्रकरणी चौकशी करून व सीसीटिव्ही फुटेज तपासून दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्‍वासन पो. नि. सपकाळे दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.