Breaking News

शेवटचे तीन दिवस ध्वनीक्षेपणाच्या वेळेत वाढ

। पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच शांतता समितीची बैठक ः सर्व विभागाचे अधिकारी हजर

अहमदनगर, दि. 27, ऑगस्ट - गणेश  उत्सव  काळात शेवटचे तीन दिवस ध्वनीक्षेपणाच्या वेळेत वाढ करण्यास उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनास परवानगी दिल्याने जिल्ह्यात शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यन्त ध्वनीक्षेपणास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व राजशिष्टचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा  जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे  यांनी दिली. 
अहमदनगर येथील पोलीस मुख्यालयात पालकमंत्री प्रा. राम शिंदे  यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत  होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, महानगर पालिका आयुक्त घनश्याम मंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक  रंजनकुमार शर्मा,  अतिरिक्त पोलस अधीक्षक घनश्याम पाटील, कॅन्टोन्मेंट  बोर्डाचे मुख्याधिकारी माने, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम आदी उपस्थित होते.
यावेळी  बोलतांना  पालकमंत्री प्रा. राम  शिंदे  म्हणाले की, गणेश उत्सव आणि त्याच बरोबर येणारे सर्व सण सौहार्दपूर्ण  वातावरणात पार पाडण्यासाठी  प्रशासनास शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांनी  सहकार्य  करावे. तसेच गणेशोत्सव  काळात गणेश उत्सव मंडळातील आरस व मिरवणूक पहाण्यास  येणार्‍या नागरिकांना त्रास होार नाही, यासाठी  महानगर पालिकेने रस्त्यावरील खड्डे,  ड्रेनेज, कचरा आदी सर्व बाबींचे योग्य ते नियोजन करावे.
तसेच बीज मंडळाने या काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी. जर वीज पुरवठा काही तांत्रिक  कारणास्तव  खंडीत करणे  आवश्यक  असेल  तर तशी माहिती नागरिकांना द्यावी, अशी सूचना ही यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. यावर्षी पोलिसदलाच्यावतीने गणेशमंडळांना बक्षिससे देण्यात येणारआहेत अशी घोषणा शर्मा यांनी केली.
प्रारंभी शांतता कमिटीचे सदस्य सर्वश्री ओबेद शेख, गणेश आष्टेकर, नलिनी गायकवाड, संजय सपकाळ, जरिना पठाण, गिरवले मामा, पंडीत खरपूडे, आशा निबांळकर आदिंनी गणेश उत्सव शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.  या बैठकीस शहरातील सर्व शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महानगर पालिका व वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.