Breaking News

भारत-चीनसंदर्भातील सरकारच्या निर्णयाला सर्वांनी साथ द्यावी - शरद पवार

पुणे, दि. 27, ऑगस्ट - भारत-चीन सिमेवर निर्माण झालेला तणाव ही देशापुढील गंभीर समस्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत एखादी भुमिका घेतल्यास  आपण आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून सरकारच्या निर्णयाला साथ द्यायला हवी, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. संसदीय कारकीर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शरद  पवार यांचा ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीष बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,  माजी मंत्री व सोसायटीचे मानद सचिव शशिकांत सुतार, माणिक सातव पाटील, राजेंद्र जगताप, जगदिश जेधे, अ‍ॅड. भगवान साळुंखे, साहेबराव जाधव उपस्थित  होते.
पवार म्हणाले, भारत चीनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून डोकलामप्रश्‍नी तणावाचे वातावरण आहे. अशा प्रसंगी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा  देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मराठा सोसाययटीच्या संदर्भात बोलताना, समाजातील सर्व घटकातील मुलांना सर्व सुविधांनीशी शिक्षण  देणार्या अनेक संस्था कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता उत्तम ज्ञानदानाचे काम करत आहेत. अशा संस्थांपैकी एक श्री शिवाजी मराठा सोसायटी आहे. छत्रपती  शाहू महाराजांनी अनेक शैक्षणिक संस्थांना हात दिला. त्यापैकी एक ही संस्था आहे, असेही पवार म्हणाले.
सामान्य माणसापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम शाहू महाराजांनी केले. ते खर्या अर्थाने रयतेचे राजे होते. शैक्षणिक संस्था वाढल्याने शिक्षणाचा विस्तार होत आहे.  मात्र या विस्ताराबरोबर शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होणेही गरजेचे आहे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण संस्थानी घेतली तर ग्रामीण आणि शहरी  भागातील गोरगरीबांची मुले चांगले गुण प्राप्त करू शकतील. यातून ज्ञान संपन्न पिढी तयार होऊन देशाच्या विकासाला चालणा मिळण्यास मदत होईल.
नवीन प्रकल्प, रस्ते, इमारती यांसह विविध गोष्टींसाठी जमिनींचा वापर केला जात असल्याने शेत जमिनी वरचेवर कमी होत आहेत आणि शेतीवर अवलंबून  असणार्यांची संख्या वाढत आहे. लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येतही वाढत होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी शेतीवर अवलंबून  असणा-यांची संख्या कमी करावी लागेल. यासाठी एका मुलांने शेती करून दुस-या मुलांने वेगळा काहीतरी मार्ग शोधने गरजेचे आहे. असेही पवार म्हणाले.
याप्रसंगी भाई वैद्य म्हणाले, शरद पवार अनुभवसंपन्न पुरोगामी विचाराचे तडपेने काम करणारे आणि यशवंतरावांनंतर उत्तम प्रशासक असणारे नेते आहेत. अनेक ज्येष्ठ  नेत्यांना त्यांचे काम पाहून धन्यता वाटते. आज देशातील परिस्थिती बिकट आहे. अशावेळी देशाची पिछेहाट होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
पालकमंत्री बापट म्हणाले, ‘शिक्षण संस्था चालविणा-यांनी शिक्षणमहर्षी व्हावे मात्र शिक्षण सम्राट होऊ नये. राजकारणात पन्नास वर्षे सतत अविरतपणे प्रभावी काम  करणे, ही सोपी गोष्ट नाही. हे काम शरद पवारांनी केले आहे. त्यामुळेच ते लोकनेते आहेत. त्यांची वैचारिक बैठकही पक्की आहे.