Breaking News

चीन सीमेवरील दिवंगत सैनिक जिल्लेवाड यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार

नांदेड, दि. 27, ऑगस्ट - चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना ह्रदय विकाराने मृत्यू झालेल्या भोकर येथील सुभेदार नरसींग शिवाजी जिल्लेवाड यांच्या पार्थिवावर  शासकीय इतमामात भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रफुल्लनगर येथील रहिवासी नरसींग शिवाजी जिल्लेवाड हे भारतीय तिबेट सीमा सुरक्षा पोलीस दलात  सुभेदार या पदावर कार्यरत होते. मंगळवारी 22 रोजी चीनच्या सीमेवर कर्तव्यावर हजर असताना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव  गुवाहाटी येथून हैदराबादमार्गे भोकर येथे आज सकाळी 9 च्या दरम्यान त्यांच्या घरी आणण्यात आले. तेथे अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्काराच्या वेळी  सैनिक व पोलीसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. स्मशानभूमीत भारतीय सैन्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी मोठ्या  संख्येने नागरिक, सैन्यातील जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, विविध पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती  होती.