Breaking News

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून फसवणूक करणारे पाच जण जेरबंद

औरंगाबाद, दि. 27, ऑगस्ट - पाच लाख रूपये दिले तर पाच दिवसात पाच कोटी रूपयांचा पाऊस पाडतो अशा प्रकारे थापा मारून पैसे बळकावण्याच्या प्रयत्नात  असणा-या पाच जणांना पैठण एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या टोळक्याकडून को-या कागदांच्या नोटांच्या आकाराच्या बंडलावर शंभर,  पाचशे, दोन हजारांच्या नोटा लावलेले तब्बल सत्तर गठ्ठे पोलिसांनी जप्त केले आहेत. अशा प्रकारे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत हे टोळके मुंबई येथिल  एका पार्टीच्या संपर्कात होते अशी कबुली त्यांनी पोलीसांना दिली आहे. या टोळीबाबत खब-यांकडून पोलिसांना सुगावा लागला होता. या टोळीतील सदस्य  जैनस्पिनर फाटा येथे पैठण तालुक्यात रहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल (शुक्रवारी) रात्री पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपीेंना नोटांच्या या  खोट्या बंडलांसह ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता त्यांनी सांगितलेल्या इतर सहका-यांच्या माहितीवरून त्यांना औरंगाबाद येथून  अटक करण्यात आली.
खब-याच्या माहितीवरून जैनस्पिनर फाटा (ता.पैठण) येथे आरोपी भाड्याच्या खोलीत राहत आहेत. यावरून शुक्रवारी राञी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सापळा रचला मध्यराञीच्या सुमारास आरोपी मुद्देमालासह खोलीत उपस्थित असल्याचे  कळताच पोलीसांनी रूमवर छापा टाकुन दोन आरोपींना मुद्दे मालासह अटक केली. या प्रकरणात संतोष सांडु घोडे रा. निल्लोड ता. सिल्लोड, त्याची पत्नी मिलन  संतोष घोडे, संतोष उर्फ बाळू सुखदेव दांडगे रा.नारेगाव औरंगाबाद, संजय पांडुरंग शिंदे रा.टि.व्हि.सेंटर औरंगाबाद, ज्ञानेश्‍वर जनार्धन सोनवणे रा. पानवडोद ता.  सिल्लोड यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.