Breaking News

शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प : डॉ. सुभाष भामरे

नंदुरबार, दि. 28, ऑगस्ट - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानले आहे. गरीब, शेतकर्‍यांचे कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांनी शेतकर्‍यांच्या  विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवीत आगामी पाच वर्षांत शेतीचे उत्पन्न दुप्पटीने  वाढविण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र व कृषि विभाग आत्मा, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया मंथन : संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचे उदघाटन आज केंद्रीय संरक्षण  राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा  अधिक्षक कृषि अधिकारी मधुकर पन्हाळे, डॉ. हेडगेवार सेवा समिती सचिव डॉ. नितीन पंचभाई, कृषि सल्लागार पुणे संतोष सहाणे, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष  कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष रवी बेलपाठक, विजय चौधरी, आदी उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. काम करण्याची त्यांच्यात ताकद आहे. त्याला वीज, पाणी,  शेतमालाला योग्य भाव आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय केला, तर तो प्रगती करू शकेल. या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विकासासाठी विविध  योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या पाहिजेत. कृषी  विभागाला शेतकर्‍यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घेत कृषी विभागाने सामान्य शेतकर्‍यापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवावेत.  शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. जमिनीच्या आरोग्यपत्रिका तयार करुन घ्यावी. शास्त्रोक्त व आधुनिक पध्दतीने शेती करीत शेतकर्‍यांनी प्रगती  साधावी. तसेच आगामी काळात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. त्यामुळे कांद्यासारखा शेतमाल तेथे ठेवता येईल आणि योग्य दर मिळाल्यावर  शेतकरी त्याची विक्री करू शकेल.
केंद्रीय मंत्री डॉ. भामरे यांनी यावेळी उपस्थितांना सुराज्य आणण्याचा संकल्प करण्याची शपथ दिली. तत्पूर्वी त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली.